बाल रक्षक महाराष्ट्र ॲप बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल रक्षक महाराष्ट्र ॲप बातमी
बाल रक्षक महाराष्ट्र ॲप बातमी

बाल रक्षक महाराष्ट्र ॲप बातमी

sakal_logo
By

शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर ‘बाल रक्षक’ ची नजर

शासनाने विकसित केले ॲपः जिल्ह्याची नोंदणी शंभर टक्के


ओंकार धर्माधिकारी, सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ ः स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटते. या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्यासाठी शासनाने एक ॲप विकसित केले आहे. ‘बाल रक्षक महाराष्ट्र’ हे या ॲपचे नाव आहे. जे विद्यार्थी शाळा सोडतात त्यांची नोंद या ॲपमध्ये केली जाते. तसेच जे विद्यार्थी अन्य शाळेत प्रवेश घेतात, त्यांचीही नोंद या ॲपमध्ये होते. त्यामुळे नेमके किती विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. त्यांची सर्व माहिती ॲपच्या माध्यमातून शिक्षण विभागाला समजते. जिल्ह्यातील शंभर टक्के नोंदणी झाली असून डिसेंबर २०२२ मध्ये या ॲपवर जिल्ह्यातील १३८९ स्थलांतरीत विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे.
नोकरी, रोजगार आणि दुष्काळ, महापूर या सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे देशात मोठ्या प्रमाणात नागरिक स्थलांतर करतात. राज्यातील अंतर्गत स्थलांतरणाचे प्रमाण अधिक आहे. स्थलांतरीत गरीब कुटुंबातील विद्यार्थी या स्थलांतरणातून शिक्षणाच्या बाहेर पडतात. यामुळे राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते. त्यांचे प्रमाण कमी करायचे असल्यास या विद्यार्थ्यांची नेमकी माहिती आणि नोंद होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने ‘बाल रक्षक महाराष्ट्र’ ॲप बनवले. या ॲपमुळे स्थलांतरीत मुलांची नोंद ठेवणे सहज शक्य झाले आहे. शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, कौटुंबिक माहिती, आधार नंबर या सर्व गोष्टींची नोंद केली जाते. त्यानंतर या विद्यार्थ्यांने दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याची माहितीदेखील ॲपवर मिळते. त्यामुळे जे स्थलांतरीत विद्यार्थी अद्याप दुसऱ्या शाळेत प्रविष्ट झाले नाहीत, त्यांची माहिती घेऊन पाठपुरावा केला जातो. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यास मदत झाली आहे.
------

‘बाल रक्षक ॲपमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नेमकी माहिती समजते. तसेच नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद होते. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या मुलांना पुन्हा या प्रवाहात आणण्याचे काम या ॲपच्या माध्यमातून होत असल्याचे ते उपयुक्त ठरले आहे.
- बी.बी.पाटील,जिल्हा समन्वयक, समग्र शिक्षण
----

‘बाल रक्षक महाराष्ट्र’ ची वैशिष्ट्ये

- शाळा सोडणाऱ्या प्रत्येक मुलाची नोंदणी ॲपमध्ये होते.
- शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची नोंद केली जाते.
- आपल्या शाळेतून गेलेला मुलगा कोणत्या शाळेत प्रविष्ट झाला हे समजते.
- शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्याने कोणत्याच शाळेच प्रवेश घेतला नसेल तर त्याची माहिती कळते.
- शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी नोंदवला जातो.
- प्रत्येक शाळेला स्वतंत्र युडीआयएसई क्रमांक मिळतो.

----

ऊस तोडणी मजुरांची मुले पुन्हा शाळेत

कोल्हापुरात ऊस तोडणीसाठी बीड येथून मजूर आले होते. यावेळी ते येथील एका शाळेत जायचे. हंगाम संपल्यावर ते पुन्हा गावी परतले. यावेळी येथील शाळेतील शिक्षकांनी ॲपवर त्यांची माहिती भरली. हे विद्यार्थी बीडमध्ये प्रविष्ट झाल्याचे त्यांना समजले. जे झाले नव्हते त्यांच्याशी संपर्क करून त्यांना प्रवेश देण्यात आला.