शासकीय कार्यालयात चहा ऐवजी आता आंबिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कार्यालयात चहा ऐवजी आता आंबिल
शासकीय कार्यालयात चहा ऐवजी आता आंबिल

शासकीय कार्यालयात चहा ऐवजी आता आंबिल

sakal_logo
By

शासकीय कार्यालयात आता चहा ऐवजी आंबिल

जिल्हाधिकाऱ्यांची अभिनव योजनाः

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ ः संयुक्त राष्ट्र संघाने भारताच्या मागणीवरून हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. स्थानिक नाचणी उत्पादकांना याचा लाभ घेता यावा आणि नाचणीची मागणी वाढावी यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शासकीय कार्यालयात चहा ऐवजी नाचण्याची आंबिल दिली जाणार आहे. याची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होईल. अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘नाचणी हे पौष्टीक तृणधान्य आहे. समाजात याची मागणी वाढावी म्हणून पुढील वर्षभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयात अभ्यागतांना चहा ऐवजी नाचणीची आंबिल देण्यात यावी, असे सुचवण्यात आले आहे. याची कोणावरही सक्ती नसेल, मात्र अधिकाधिक लोकांनी हा उपक्रम राबवावा यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. या शिवाय शासकीय कार्यालयात पुष्पगुच्छ भेट देण्यापेक्षा १ किलो नाचणी भेट म्हणून द्यावी, असेही सुचवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद येथे आठवड्यातून एक दिवस नाचणीचे विविध पदार्थ बनवून त्यांची विक्री केली जाणार आहे. महिला बचतगटाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाईल. त्यानंतर हा उपक्रम तालुकास्तरावरही राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक हॉटेलमध्ये ‘मिलेट मेन्यू कार्ड’ ठेवले जाईल. तसेच तृणधान्यांची माहिती सांगणारे फलकही येथे ठेवले जातील. आंगणवाडी मध्ये पोषण आहारात नाचणीच्या पदार्थांचा समावेश केला जाणार आहे. रुग्णालयांच्या जेवणातही या पदार्थांचा समावेश केला जावा यासाठी प्रयत्न केले जातील. या सर्व उपक्रमातून समाजात तृणधान्याचे महत्त्व लक्षात यावे. त्यांची मागणी वाढावी आणि त्यातून शेतकऱ्यांना अधिल लाभ मिळावा हा हेतू आहे.’
या पत्रकार परिषदेला जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक रविंद्र पाठल, नाचणी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ.योगेश बन, जिल्हा अभियान व्यवस्थापन वनिता डोंगरे, बांधकाम व्यावसायिक आदित्य बेडेकर यांच्यासह प्रशासकी अधिकारी उपस्थित होते.
----------
नाचणीचा भाव वधारला

नाचणी पिकाचा समावेश हमी भावाच्या यादीत केल्याने मोठ्या प्रमाणात नाचणी उत्पादन होऊ लागले आहे. २०२१ मध्ये शासनाने ३३४ शेतकऱ्यांकडून ३३ रुपये दराने सुमारे २५३१ क्विंटल नाचणी खरेदी केली. २०२२ मध्ये ३५.७८ रुपये दराने ६१५६ क्विंटल नाचणी खरेदी केली गेली. सध्या बाजारातही ४० ते ४५ रुपये किलो दर नाचणीला मिळाला आहे.
-------

मिलेट वॉक, बाईक रॅलीचे आज आयोजन

‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ निमित्ताने गुरुवारी (ता.९) दुपारी ४ वाजता कृषी विभाग यांच्यामार्फत मिलेट वॉक व मिलेट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली.