
मुंबईत घर आमच्या हक्काचे...!
gad95.jpg
87857
गडहिंग्लज : मुंबईत घर मिळावे या मागणीसाठी गिरणी कामगारांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.
-------------------------------
मुंबईत घर आमच्या हक्काचे...!
गिरणी कामगारांनी मोर्चाद्वारे ठणकावले; प्रांत कार्यालयासमोर दिवसभर धरणे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : मुंबईत घरासाठी गिरणी कामगार व वारसदारांचा लढा सुरूच आहे. त्यांनी आज येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत घर आमच्या हक्काचे असल्याचे ठणकावले. प्रांत कार्यालयासमोरच ठिय्या मारत दिवसभर धरणे धरली. सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
येथील राम मंदिरात गडहिंग्लज तालुक्यातील गिरणी कामगार जमले. तेथून दुपारी साडेबाराला मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलकांनी प्रांत कार्यालयाच्या दारातच ठिय्या मारत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. अमृत कोकितकर, पद्मिनी पिळणकर, विठ्ठल कदम, धोंडिबा कुंभार, बाळाराम सुपले, शिवाजी कुराडे यांची भाषणे झाली.
गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. रामजी देसाई, बंडू शिंदे, केरबा पाटील, अर्जुन पाटील, लक्ष्मण बेळी, पांडुरंग शिंदे, जयसिंग कुंभार, कल्पना नाईक, लक्ष्मीकांत नाईक, धोंडिबा कुंभार, सोनाबाई नाईक, मारुती पाटील, गुंडाबाई नाईक सहभागी झाले होते.
------------------------------
चंदगडला तहसील कार्यालयावर मोर्चा
चंदगड ः मुंबईतील गिरणी कामगारांना तेथेच घरे मिळायला हवी या आग्रही मागणीसाठी सर्व श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाने तालुक्यातील गिरणी कामगारांनी आज येथे तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. तहसिलदार विनोद रणावरे यांना निवेदन दिले.
रवळनाथ मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा नवीन वसाहत मार्गे तहसील कार्यालयावर आला. गोपाळ गावडे, हणमंत खामकर, कृष्णा मुळीक, कृष्णा खोराटे, आणाप्पा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
----------
आजऱ्यात मोर्चा
आजरा ः मुंबईमधील एनटीसीच्या ताब्यातील पंधरा गिरणींच्या जागेवरच गिरणी कामगारांना घरे मिळावीत. ही आमची मागणी आहे. येथे घर घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारने या प्रश्नात गांभिर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन दत्तात्रय अत्याळकर यांनी केले. येथील आजरा तहसीलदार कार्यालयावर आजरा तालुक्यातील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी मोर्चा काढला. भाजी मंडईतून मोर्चाला सुरवात झाली. मुख्य बाजारपेठ, संभाजी चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. शांताराम पाटील, संजय घाटगे, नारायण भडांगे, तानाजी पाटील, गोपाळ रेडेकर, निवृत्ती मिसाळ यांची भाषणे झाली. आबा पाटील, नारायण राणे, कृष्णा नार्वेकर, शांताराम हरेर, धोंडीबा कांबळे आदी उपस्थित होते.
----------
बारा तारखेचा मोर्चा रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांसोबत १३ तारखेला बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे. यामध्ये विविध मागण्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे १२ तारखेचा मुख्यमंत्री निवासस्थानावर होणारा मोर्चा रद्द करण्यात येणार असल्याचे अत्याळकर यांनी सांगीतले.