
विश्वगुरू होण्यासाठी भारताला शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची गरज
87970
भारताला शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची गरज
---
श्रीराम पवार; शिवाजी विद्यापीठातील डॉ. अंजली पाटील स्मृती व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः विश्वगुरू, महासत्ता व्हायचे असेल, तर भारताला प्रथम आपल्या शेजारील नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश या राष्ट्रांशी संबंध सुधारणे गरजेचे आहे. लष्करी, आर्थिक ताकदही वाढविणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभागाच्या ‘पी. जी. डिप्लोमा इन इंटरनॅशनल रिलेशन ॲण्ड सिक्युरिटी स्टडीज्’तर्फे आयोजित डॉ. अंजली पाटील स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘भारताचे परराष्ट्र धोरण ः सातत्य आणि बदल’ असा त्यांचा विषय होता. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सेमिनार हॉलमधील या व्याख्यानमालेस प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.
श्रीराम पवार म्हणाले, ‘भारताच्या शेजारील सर्व राष्ट्रांमध्ये विविध माध्यमांतून चीनने शिरकाव केला आहे. त्यामुळे बांगलादेश वगळता अन्य राष्ट्रांमध्ये थेट भारताचे म्हणणे ऐकण्यासारखी परिस्थिती नाही. हे चित्र बदलण्यासाठी भारताला या राष्ट्रांशी संबंध सुधारावे लागतील. दुसऱ्या महायुद्धापूर्वीची आणि आजची परिस्थिती परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने बदलली आहे. अणुबॉम्बच्या प्रत्यक्ष वापरानंतर सैन्यावर आधारित लढल्या जाणाऱ्या युद्धापेक्षा शस्त्राच्या आधारे लढले जाणारे युद्ध निर्णायक ठरू शकते, हे जगाने पाहिले आहे. त्यानुसार लष्करी ताकद वाढविण्याचा सर्व राष्ट्रांनी प्रयत्न केला. पंतप्रधान ज्या देशात जातील, तो देश आपण जिंकला, अशी भ्रामक कल्पना सोडून देऊन लष्करी, आर्थिक ताकद वाढविण्याची गरज आहे. बदलत्या काळानुसार भारताने परराष्ट्र धोरणाचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरेल.’
डॉ. शिंदे म्हणाले, ‘जागतिक राजकारणात कोरोनापूर्व आणि कोरोनानंतर अशा पद्धतीने मोठे बदल झाले आहेत. कोरोनापूर्व काळात भौतिक शस्त्राच्या आधारे महासत्ता बनण्याचा प्रयत्न विविध राष्ट्रांकडून सुरू होता. कोरोनानंतरच्या काळात मात्र सध्या जैविक शस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची भीती आहे.’
प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्घाटन झाले. डॉ. अंजली पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. डॉ. पाटील यांच्या ज्येष्ठ भगिनी विजयमाला देसाई, बंधू झुंजारराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. भारती पाटील, आरती पाटील, जयमाला सूर्यवंशी, वैशाली मोहिते, विवेक देसाई, विलास देसाई, विश्वनाथ केसरकर, डॉ. सुखदेव उंदरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. नेहा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री कांबळे यांनी आभार मानले.
चौकट
...तर जगातील सर्व राष्ट्रांना झळ बसणार
श्रीराम पवार म्हणाले, ‘जागतिक पातळीवर सुरुवातीला महासत्ता म्हणून इंग्लंड समोर आले. त्यानंतर रशियाची उभारणी झाली. अमेरिका महासत्ता म्हणून पुढे आली. आता चीन महासत्ता बनू पाहत आहे. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यातील वर्चस्ववादातून कधी युद्धाची ठिणगी पडेल, हे सांगता येत नाही. ते झाल्यास त्याच्या झळा जगातील सर्व राष्ट्रांना बसणार आहेत.’
चौकट
डॉ. अंजली पाटील यांचे जीवनकार्य प्रेरणादायी
‘युनो’मधील शांतता मोहिमेत डॉ. अंजली पाटील यांनी योगदान दिले. त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे श्रीराम पवार यांनी सांगितले. १९७० च्या दशकात संदर्भ साधनांची कमतरता असतानाही डॉ. पाटील यांनी ‘फेटो’ विषयावर शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी केली. त्यांचे जीवनकार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांचे चरित्र हे कुटुंबीयांनी पुस्तक स्वरूपात समाजासमोर आणावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.
चौकट
जागतिक राजकारणात अर्थकारणाची मोठी भूमिका
श्रीराम पवार म्हणाले, ‘जागतिक पातळीवर देशा-देशांमधील राजकारणात अर्थकारणाची मोठी भूमिका असते. त्याचे उदाहरण अमेरिका आहे. अरब राष्ट्रांतील खजिन तेलामुळे अमेरिका त्यांच्याशी चांगले संबंध ठेवून होते. मात्र, स्वतःच्या देशात तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात सापडल्याने अमेरिकेने या अरब राष्ट्रांतील कारभाराकडे लक्ष देणे बंद केले.’