काजू बोर्डासाठी प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काजू बोर्डासाठी प्रयत्न
काजू बोर्डासाठी प्रयत्न

काजू बोर्डासाठी प्रयत्न

sakal_logo
By

चंदगड काजू बोर्डासाठी
नेतृत्वाचा लागणार कस

सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा

चंदगड, ता. ९ ः राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज काजू फळ विकास योजनेसाठी १ हजार ३२५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. तसेच दोनशे कोटींच्या तरतुदीसह काजू बोर्डाला मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सर्व निधी कोकणसाठी असा उल्लेख केल्याने काजू बोर्ड नेमके कोठे होणार याची उत्सुकता आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील चंदगड, आजरा व कर्नाटकचा सीमाभाग विचारात घेता ते चंदगडलाच होणे हितावह आहे; परंतु आता त्यासाठी स्थानिक नेतृत्वाचा कस लागणार आहे.
काजू फळ विकास योजनेमुळे या विभागात काजू पिकाच्या लागवडीला चालना मिळणार आहे. त्यासाठी विहीर, विंधण विहीर, ठिबक सिंचन यासाठी अर्थसहाय्य होईल. संकरित जातींमुळे दर्जेदार काजू मिळेल. स्थानिक उत्पादन वाढल्यास परदेशातील आयात कमी होईल. पर्यायाने स्थानिक प्रक्रिया उद्योजकांना लाभ होईल. त्याशिवाय काजूच्या फळावर प्रक्रिया उद्योगाला वाव मिळेल. काजू बी व फळावरील प्रक्रिया उद्योगामुळे स्थानिक रोजगारात वाढ होईल. काजू उत्पादकांनाही चांगला मोबदला मिळेल. त्यामुळे त्याचे काजू उत्पादकांतून स्वागत होत आहे.
हे बोर्ड चंदगडला व्हावे यासाठी या विभागाचे आमदार राजेश पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकऱ्यांनीही आग्रह धरला आहे. यासंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय कृषिमंत्र्यांसह सर्वच महत्त्वाच्या मंत्र्यांना निवेदने दिली आहेत. काजू उत्पादन करणारा कोकण विभाग तसेच घाटमाथ्यावरील चंदगड, आजरा, भुदरगडसह कर्नाटकातील बेळगाव, खानापूरचा परिसर विचारात घेता चंदगड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे तिथेच काजू बोर्ड होणे हितावह असल्याचे जाणकारांचे मत आहे. ते कोठे स्थापन होणार याबाबत उल्लेख नसल्याने ते कोकणात जाणार का, अशीही शंका उपस्थित होत आहे. ते चंदगडला व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींना आपली ताकद वापरावी लागणार आहे.

कोट
काजू बोर्ड चंदगडला होणे हे सर्वार्थाने योग्य आहे. त्यासाठी जाणकारांची मते घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला आहे. शासन त्यालाच मंजुरी देईल याची खात्री आहे.
-राजेश पाटील, आमदार.

कोट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काजू बोर्डाबाबत बोलताना चंदगड व आजऱ्याचा उल्लेख केला आहे. हे बोर्ड चंदगडलाच व्हावे यासाठी त्यांच्याकडे सुरवातीपासून आग्रह धरला आहे. त्याला यश येईल यात शंका नाही.
- शिवाजीराव पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य-भाजप.