
आमचं बजेट
88014
‘सकाळ’मधून मांडलेल्या अपेक्षा
पूर्ण करण्याचा प्रयत्न करू
महापालिका प्रशासक डॉ. बलकवडे; ‘आमचं शहर, आमचं बजेट’ पुस्तिका सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः‘विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासू शहरवासीयांनी ‘सकाळ’मधील ‘आमचं शहर, आमचं बजेट’ उपक्रमातून मांडलेल्या अपेक्षांचा यंदाच्या अंदाजपत्रकात केवळ समावेशच नव्हे तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने ‘आमचं शहर, आमचं बजेट’ हा उपक्रम राबवला. थेट लोकांमध्ये जाऊन विविध क्षेत्रनिहाय त्यातून सूचना घेतल्या. त्यावर आधारित पुस्तिका आज सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार यांच्या हस्ते प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, वृत्तसंपादक प्रसाद इनामदार, वृत्तसंपादक तानाजी पोवार, मुख्य बातमीदार निवास चौगले, वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा) अरविंद वर्धमाने, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे, महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, वित्त अधिकारी भगवान काटे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘दरवर्षी ‘सकाळ’कडून हा उपक्रम राबवत असताना केवळ संकल्पना मांडल्या जात नाहीत तर त्यासाठी तज्ज्ञांना बोलवून चर्चा घडवली जाते. बऱ्याच संकल्पना राबवल्या पाहिजे असे वाटते. पण, त्यांना शास्त्रीय आधार, अभ्यास नसल्याने त्या राबवता येत नाहीत. त्या बाजूला पडतात. अशा संकल्पनांपेक्षा तज्ज्ञांनी अभ्यास, विचार करून मांडलेल्या अपेक्षा राबवणे शक्य असते. ‘सकाळ’ने पुस्तिकेतून नागरिकांच्या अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्यांचा अंदाजपत्रकात समावेश करून त्या पूर्ण केल्या जातील.’
‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘नागरिकांच्या अपेक्षा व अंदाजपत्रक यात अंतर पडल्याचे जाणवल्याने ‘सकाळ’ने हा उपक्रम राबवण्यास सुरूवात केली. आतापर्यंत राबवलेल्या उपक्रमात नागरिकांकडून केवळ कामांच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात नाहीत तर महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल, सेवांमध्ये गुणवत्ता कशी वाढवता येईल हे विचारही मांडले आहेत. वीज, पाणी यासारख्या अपेक्षांची पूर्तता व्हायलाच हवी. पण, त्यापुढे जाऊन नवीन गरजा, अपेक्षा तयार झाल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी आली आहे. त्यासाठी केवळ एका वर्षासाठीचे अंदाजपत्रक असे बघण्यापेक्षा पुढील पंधरा वर्षांचा विचार करून नियोजनाच्यादृष्टीने विचार त्यात झाला पाहिजे. यंदाच्या अंदाजपत्रकात विविध सेवा सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचा विचार व्हावा. यंदा सुचवलेल्या सूचनांमधूनही महापालिकेला पुढे काय करता येईल याचे नियोजन करता येईल. महापालिकेने त्यादृष्टीने नागरिकांच्या अपेक्षांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करावा. वस्तुस्थितीदर्शक अंदाजपत्रक मांडले जावे.’’