
बार असो. व्याख्यान अँड संभाजी मोहिते
87967
राजर्षी शाहू महाराजांचे विचार अंगीकारणे हा ध्यास हवा
ॲड. संभाजीराव मोहिते : जिल्हा बार असोसिएशनमध्ये व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : ''लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांचे चरित्र व विचार सर्वांनी अंगीकृत करणे हा आपल्या सर्वांचा ध्यास असायला हवा,'' असे ॲड. संभाजीराव मोहिते यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या औचित्याने संपूर्ण महाराष्ट्रात १० फेब्रुवारी ते १० एप्रिलपर्यंत ते १०० व्याख्याने देणार आहेत. त्यानिमित्त जिल्हा बार असोसिएशनमध्ये ''लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा आणि माणूस’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल प्रमुख पाहुण्या होत्या.
ॲड. मोहिते म्हणाले, ''राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात पडलेला दुष्काळ, प्लेगची साथ यावेळी दाखवलेली तत्परता व जनतेची घेतलेली काळजी हे त्यांचे काम राजा म्हणून आजही आदर्शवत आहे. छत्रपती शाहू महाराज हे जलसंपत्ती, उद्योग, रोजगार देणारा पाहिला दूरदृष्टी राजा होते. स्वस्त धान्य दुकान ही संकल्पना निर्माण करणारे ते पहिले राजे आहेत. त्यांनी शिक्षण, कुस्ती, व्यापार, उद्योग यामध्ये केलेले कार्य आजही दिशादर्शक आहे. सर्व जातींच्या मुलांना शिक्षण घेता यावे याकरिता त्यांनी वसतिगृहे सुरू केली.’
बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांच्या हस्ते प्रमुख ॲड. मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी स्वागत केले. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. संदीप चौगुले, ॲड. तृप्ती नलवडे, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. प्रशांत चिटणीस, ॲड. अजित मोहिते, ॲड. रणजित गावडे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी आभार मानले.