
अर्थसंकल्पात कोल्हापूर
शाहू मिल, पंचगंगा, तीर्थक्षेत्र
विकासासाठी तरतुद नाहीच
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः जोतिबा मंदिर विकासासाठी ५० कोटी, चित्रनगरी व कोल्हापुरी चप्पल क्लस्टर, चंदगड, आजऱ्यात काजू फळ विकास योजना वगळता राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूरची उपेक्षाच झाली आहे. शहर आणि जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना या अर्थसंकल्पात ठेंगा दाखवला असून कोल्हापुरात येऊन मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि अर्थसंकल्पात मात्र त्याकडे दुर्लक्ष करायचे, ही परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.
गेल्या वर्षी राज्य शासनातर्फे भव्य प्रमाणात शाहू कृतज्ञता पर्व साजरे करण्यात आले. त्यावेळी सत्तेत असलेल्या मंत्री व आमदारांनी शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, टेक्स्टाईल पार्क करण्याची घोषणा केली होती. त्यावेळचे मंत्री आजही मंत्रिमंडळात आहेत; पण आजच्या अर्थसंकल्पात या कामासाठी रुपायाचीही तरतूद नाही. यावरून उठता बसता शाहू महाराजांचा जयजयकार करणाऱ्यांकडून प्रत्यक्षात त्यांची उपेक्षाच केली आहे.
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याच्या घोषणा तर कितीतरी वेळा झाल्या; पण त्यासाठीही मागणी करून निधीची तरतूद नाही. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तर सरकारच्या खिसगणतीतच नसल्यासारखी स्थिती आहे. या आराखड्याची घोषणा होऊन दहा वर्षे झाली; पण पुढे त्याचे काय झाले, हेही कळायला मार्ग नाही. कोल्हापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मागणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे, त्यासाठीच्या आवश्यक त्या पायाभूत सुविधाही शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उपलब्ध आहेत; पण या प्रश्नाकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाचा यावर्षी सुवर्ण महोत्सव आहे. त्यासाठी ४५ कोटींची घोषणा केली होती. यापैकी सात कोटी मिळाले. पुढील निधीबाबत काहीही तरतूद झालेली नाही. शहरातील ४३ शासकीय कार्यालये एकाच छताखाली यावेत, या उद्देशाने बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठीच्या १०४ कोटींच्या निधीचाही विचार झालेला नाही. हद्दवाढीला पर्याय म्हणून ४२ गावांसाठी प्राधिकरण करण्यात आले. त्यासाठी शंभर कोटींची घोषणा झाली; पण प्रत्यक्ष निधी किती आला, हा संशोधनाचा विषय आहे. नागपूरच्या क्रीडा संकुलासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर झाला; पण त्याचवेळी कोल्हापूर जिल्हा क्रीडा संकुलाला रुपयाही मिळालेला नाही.
माणगावचे स्मारक उपेक्षित
माणगाव परिषदेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल या परिसराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष अर्थसंकल्पात या स्मारकाचा उल्लेखही झाला नाही, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. त्याचबरोबर केशवराव भोसले नाट्यगृहासाठी नऊ कोटी ४३ लाख यापूर्वी मंजूर होते, त्यापैकी एक कोटीचा निधी मिळाला. उर्वरित निधीबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही.
आमदारांकडून निवेदन
शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या कामासाठी निधी मिळावा, यासाठी काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाने अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती; पण त्यापैकी एकही मागणी पूर्ण झालेली नाही.
यासाठी मिळाला निधी
जोतिबा तीर्थक्षेत्र विकास - ५० कोटी
कोल्हापूर आणि मुंबई चित्रनगरीसाठी - ११५ कोटी
कोल्हापुरी चप्पल क्लस्टर विकसित करणार
चंदगड, आजरा येथे काजू फळ विकास योजना राबवणार
नव्या नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाला नृसिंहवाडी जोडणार