
रस्त्यांसाठी १०० कोटी निधी
शहरातील १६ रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी ः क्षीरसागर
कोल्हापूर, ता. ९ ः महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत महानगरपालिका हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्यासाठी सादर केलेल्या १६ रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पावसाळ्यापूर्वी कामे सुरू होतील. आणखी रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजुरीच्या टप्प्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
क्षीरसागर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी नवीन सादर केलेल्या २३७ कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. पहिल्या टप्प्यासाठी १६ कामांसाठी १०० कोटींच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली. चार दिवसांपूर्वी मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आज महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत झालेल्या बैठकीत रस्त्यांसाठी या १०० कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली. ’’ यावेळी माजी नगरसेवक राहुल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, अभिजीत काशीद, विपुल भंडारी, अर्जुन आंबी उपस्थित होते.
३० टक्के महापालिकेचा हिस्सा
या निधीतून १६ रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटर, ड्रेनेज लाईन व फुटपाथ यांचा विकास करण्यात येणार आहे. मंजूर निधीतील ७० टक्के हिस्सा राज्य शासनाचा असून ३० टक्के हिस्सा महानगरपालिकेचा असेल. ३० टक्के निधीबाबतचे हमीपत्र महापालिका प्रशासनाने सादर केले असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.
........................
हे होणार रस्ते
दसरा चौक ते इंदिरासागर हॉटेल चौक, सुभाष रोड ते भोसले हॉस्पिटल, लक्षतीर्थ चौक ते आण्णासो शिंदे स्कूल, राजारामपुरी माऊली चौक ते गोखले कॉलेज ते विश्वजीत हॉटेल, निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह, राधानगरी रोड ते गंगाई लॉन, शाहू सेना चौक ते झूम प्रकल्प, अनुग्रह हॉटेल ते संघवी बंगला, विश्वेश्वरय्या हॉल ते चंदवाणी हॉल, हॉटेल रसिका ते जाधववाडी रिंगरोड, ॲपल हॉस्पिटल ते वसंतनगर ते जिल्हा परिषद कपौंड, गोल्ड जिम ते सदर बाजार चौक, लक्ष्मीपुरी जैन मंदिर ते पान लाईन ते धान्य बाजार, वृषाली आयलॅंड ते पर्ल हॉटेल ते केएमसी फिजीओथेरपी सेंटर, निर्माण चौक ते जरगनगर शेवटचा स्टॉप, खरी कॉर्नर ते उभा मारूती चौक.