
कोल्हापूरच्या कलाकारांचा चित्रपट आजपासून भेटीला
कोल्हापूरच्या कलाकारांचा चित्रपट
आजपासून भेटीला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : अभिनय, गीत-संगीत, दिग्दर्शन, आदी क्षेत्रांतील कोल्हापुरातील स्थानिक कलाकारांनी एकत्रित येवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमधील ग्रामसेवकाचा संघर्ष मांडणारा ‘लढा पंचायतीचा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रेक्षकांच्या भेटीला उद्या, शुक्रवारपासून हा चित्रपट येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील पहिल्या लॅाकडाऊनच्या कालावधीत ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, डॅाक्टर, पोलिस शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक आदींनी काम केले. त्यावेळच्या ग्रामसेवकांच्या संघर्षाचा, त्या कालावधीत त्यांची झालेली कुचबंणा, हाल अपेष्टा यासह काही वात्रट लोकांमुळे झालेला त्रास आणि त्यातून होणारा विनोद, आदींची मांडणी या चित्रपटामध्ये केली आहे. रत्नागिरी येथे महिला ग्रामविकास अधिकारी असलेल्या डॉ. पदमजा खटावकर यांनी ग्रामसेवकाच्या जीवनावरील ‘लढा पंचायतीचा’ या पहिल्याच चित्रपटाची निर्मिती केली असल्याची माहिती दिग्दर्शक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दुर्गाप्रेरणा फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मिती असलेल्या या चित्रपटाला विविध ठिकाणी झालेल्या पाच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट, अभिनेत्री, दिग्दर्शक या विभागातील पारितोषिके मिळाली असल्याचे पाटील यांनी सांगितले. या वेळी डॉ. खटावकर, एन. डी. चौगले, उमेश बोळके, आदी उपस्थित होते.