
हद्दवाढ बातमी
‘हद्दवाढीबाबत सरकारचे वक्तव्य
बेजबाबदारपणाचे, निषेधार्ह’
कोल्हापूर, ता. १० : कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारच्या वतीने केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे, निषेधार्ह आहे. हद्दवाढ करणार नसाल तर तशी भूमिका स्पष्टपणे मांडावी. शहरवासीयांसमोर गाजर धरण्याची गरज नाही, असे पत्रक कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीने प्रसिद्धीस दिले आहे.
आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आमदार जयश्री जाधव यांनी हद्दवाढीबाबत सरकार निर्णय घेत नसल्याने विकास खुंटल्याचे सांगितले. सरकारच्यावतीने मंत्री उदय सामंत यांनी महापालिका निवडणुकीच्या अगोदर सहा महिने हद्दवाढीबाबत प्रक्रिया करता येणार नाही, असे दिले. हे उत्तर आश्चर्यकारक व संतापजनक आहे. शहरवासीयांची दिशाभूल करणारे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी असे उत्तर केव्हाही दिले नव्हते. महापालिकेची मुदत संपून सव्वादोन वर्षाहून अधिक काळ झाला आहे. निवडणुका केव्हा होणार? हे मंत्री सामंत नव्हे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालही सांगू शकत नाहीत. वस्तुस्थिती लक्षात घेता सरकारने केव्हा तरी खरे बोलले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.