पत्रके आणि पत्रके, अन्य बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके आणि पत्रके, अन्य बातम्या
पत्रके आणि पत्रके, अन्य बातम्या

पत्रके आणि पत्रके, अन्य बातम्या

sakal_logo
By

88199
कोल्हापूर : पोलिस-सुकन्या योजनेच्या प्रारंभप्रसंगी मान्यवर.

पोलिस सोसायटी सभासदांच्या
मुलांकरिता पोलिस-सुकन्या योजना

कोल्हापूर : दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडीट सोसायटीने सभासदांच्या मुलांकरिता पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या धर्तीवर पोस्ट आणि अन्य वित्तीय संस्थांच्या तुलनेत अधिक लाभ मिळवून देणारी पोलिस-सुकन्या योजनेची सुरुवात केली. कसबा बावडा येथील गृहयोग सोसायटी हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व महिला पोलिसांकरिता हळदी-कुंकू समारंभ अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाला. ठेवीदार महिलांना नवीन योजनेची ठेव पासबुके आणि सर्व महिलांना भेट वस्तूंचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. संचालक जितेंद्र कुलकर्णी यांनी स्वागत केले. संस्थाध्यक्ष दत्तात्रय दुर्गुळे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा याविषयी आणि नवीन ठेवीविषयी मार्गदर्शन केले.
...
कमला कॉलेजमध्ये काव्यवाचन स्पर्धा
कोल्हापूर : कमला कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त कमला कॉलेज मराठी विभाग आणि वाचनकट्टा संस्थेतर्फे काव्यवाचन स्पर्धा झाली. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. वाचन कट्ट्याचे अध्यक्ष युवराज कदम यांनी वाचन कट्ट्याच्या उपक्रमांची माहिती दिली. मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. अनिल घस्ते यांनी परीक्षण केले, तर प्रा. डॉ. विश्वनाथ तराळ यांनी आभार मानले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर काव्यवाचन स्पर्धेस सुरुवात झाली. स्पर्धेत रेणू मगदूम (प्रथम), राजलक्ष्मी कदम (द्वितीय), अदिती काटे (तृतीय), उत्तेजनार्थ ऋतुजा बिराजे, साक्षी यादव, सलोनी सोनवणे यांनी यश मिळविले.
...
रोजगार मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता कॉलेज ऑफ कॉमर्स येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे १५ पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे १५०० पेक्षा जास्त रिक्त पदे मेळाव्याकरिता कळविली आहेत. या पदांकरीता किमान आठवी, नववी उत्तीर्णांसह, १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती बरोबर आणणे आवश्यक आहे. तसेच स्वयंरोजगाराकरीता विविध महामंडळाकडील शासकीय कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार असून या संधीचा लाभ उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, उपआयुक्त अ. उ. पवार यांनी केल्याची माहिती सहायक आयुक्त सं. कृ. माळी यांनी पत्रकाद्वारे दिली.
...

दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आरोग्य शिबिर
कोल्हापूर : डॉ. अहल्याबाई दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दाभोळकर मेमोरिअल हॉस्पिटल आणि ‘पी. के’ ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. डॉ. सीमरन चव्हाण, अनिता काळे, लक्ष्मी शिरगावकर, डॉ. बी. एम. हिर्डेकर, गिरीश सामंत यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा तेंडुलकर यांनी स्वागत केले. शिबिराचा उद्देश आणि माहिती देण्यात आली. दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अरविंद मांजरेकर उपस्थित होते. शिबिरात ४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. जरुरीप्रमाणे त्यांच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी डॉ. मांजरेकर, डॉ. नीलेश करपे, डॉ. अभिजित गुणे, डॉ. प्रवीण कारंडे, डॉ. ऋतुजा कारंडे, डॉ. महेश दानोळीकर, डॉ. जय रणदिवे, तसेच कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
...
‘श्री संत गाडगे महाराज सेवा’तर्फे कार्यक्रम
कोल्हापूर : संत गाडगे महाराज यांची १४७ वी जयंती श्री संत गाडगे महाराज सेवा संस्थेतर्फे साजरी झाली. यावर्षी ओढ्यावरील श्री रेणुका मंदिराच्या दारात कुष्ठरोगी बसलेले असतात, त्यांना अन्नदान म्हणून मसाले भात, पाणी, तेथील स्त्रियांकरीता साड्या, पुरुषांना कपडे वाटप करण्यात आले. ऑल इंडिया भेलचे रवींद्र शिंदे, माजी नगरसेवक भरत लोखंडे यांनी कपडे, साड्यांकरीता अर्थसाह्य दिले. संस्थापक अध्यक्ष प्रकाश रांगणेकर, श्री. लोखंडे, श्री. शिंदे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनील रसाळ, दीपक लोखंडे, सुभाष पाटील, बाळासाहेब शेख, प्रकाश भोरे, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
...
मूत्रपिंड दिनानिमित्त जनजागरण रॅली
कोल्हापूर : जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त कॉलेज ऑफ कॉमर्स, पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, मगदूम एण्डो सर्जरी इन्स्टिट्यूटतर्फे जनजागरण रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीची सुरूवात कॉमर्स कॉलेजपासून झाली. ती पुढे शिवाजी पुतळा, शाहू पुतळा, एस.टी. स्टॅण्डवरून जात शहाजी लॉ कॉलेज येथे येऊन सांगता झाली. रॅलीत कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. विजय चव्हाण, डॉ. प्रकाश शरबिद्रे, डॉ. योगिता नाईक, डॉ. ज्योती निकम, प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, प्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे, डॉ. एम. सी. शेख, डॉ. सविता रासम, डॉ. आर. एस. नाईक, प्रा. एस. एस. बेनाडे आदी उपस्थित होते.
...
तुकाराम बीजेचा सोहळा आज
कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठामध्ये तुकाराम बीजेचा सोहळा शनिवारी (ता. ११) कमला कॉलेज सेमिनार हॉलमध्ये सकाळी ११ वाजता होत आहे. यानिमित्त ‘तुकाराम गाथे’चे अभ्यासक मारुती जाधव (तळाशीकर गुरूजी) यांचे व्याख्यान होईल. ‘संत तुकाराम’ यावर व्याख्यान असेल. या व्याख्यानाचा संत साहित्याच्या अभ्यासक, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.