
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीमध्ये वाढ करा
सावित्रीबाई फुले
शिष्यवृत्तीत वाढ करा
भारतीय दलित महासंघाची मागणी; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्गातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी भारतीय दलित महासंघाने शुक्रवारी केली. त्याबाबतचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले.
आर्थिक दुर्बल घटकांतील मुलींची शाळांमधील उपस्थिती वाढावी. त्यांना शैक्षणिकदृष्ट्या कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी शासनाने २६ वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. याअंतर्गत पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना ६०० रुपये, तर आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु, वाढती महागाई आणि बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे शैक्षणिक साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांना शैक्षणिकदृष्ट्या आर्थिक अडचण येऊ लागल्या आहेत. परिणामी त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्याचा विचार करून शासनाने पाचवी ते सातवीपर्यंतच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत पाच हजार आणि आठवी ते दहावीच्या शिष्यवृत्तीमध्ये १० हजार रुपयांची वाढ करावी, अशी मागणी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध कांबळे, चंद्रकांत काळे, आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या तीन वर्षांत काही मुलांना अद्याप सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्याबाबत शासनाने सकारात्मक पाहिले पाहिजे. ज्या मुलींना अद्याप ही शिष्यवृत्ती दिलेली नाही, त्यांना तीही द्यावी, अशी ही मागणी पुढे येत आहे.