महापालिकेत नोकरीच्या अमिषाने फसवणूक

महापालिकेत नोकरीच्या अमिषाने फसवणूक

88250
...
महापालिकेत नोकरीच्या अमिषाने फसवणूक

पावणे दोन लाख रुपयांची फसवणूकः पांगिरे येथील एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १० ः कोल्हापूर महानगरपालिकेत लिपिक पदावर नोकरी लावतो, असे अमिष दाखवून पावणे दोन लाख रुपयांची फसवणूक
करणाऱ्याला आज लक्ष्‍मीपुरी पोलिसांनी अटक केली. संतोष रंगराव पाटील (वय ३५, रा.पांगिरे, ता.भुदरगड) असे त्याचे नाव आहे. मार्च २०२१ पासून कालपर्यंत त्याने ही फसवणूक केल्याची फिर्याद युगंधर बाळासाहेब मगदूम (रा.महागाव, ता.गडहिंग्लज) यांनी दिली आहे. युगंधर यांनी संतोषला महानगरपालिकेच्या दारात पैसे दिल्यामुळे हा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले.
पोलिस आणि फिर्यादी यांनी दिलेली माहिती अशी, साधारण तीन वर्षांपूर्वी संशयित आरोपी संतोष हा पाकिट हरविले आहे, म्हणून
गडहिंग्लज बसस्थानकावर थांबला होता. त्यावेळी फिर्यादी युगंधरची शिक्षिका असलेल्या आईने त्याला घरी जाण्यासाठी शंभर रुपयांची मदत केली होती. तेंव्हा संतोषने फिर्यादी युगंधरचा मोबाईल क्रमांक घेतला होता. नंतर पैसे पाठवून देतो असे ही सांगितले होते. कालांतराने त्याने मगदूम कुटुंबियांशी ओळख वाढविली. यातून त्याने कोल्हापूर महानगरपालिकेत मुकादम म्हणून नोकरी देतो, यासाठी काहीच पैसे द्यावे लागणार नाही असे सांगितले. त्यावेळी कोल्हापुरात भेट झाली आणि तेंव्हा त्याने ‘साहेबां’ना द्यावे लागणार म्हणून पैसे घेतले. यानंतर पुन्हा दोन-तीन वेळा त्यांची भेट महापालिका इमारतीच्या दारात झाली. तेथेही त्यांच्याकडून या ना त्या कारणावरून पुन्हा पैसे घेतले. यापैकी काही रोख तर काही ऑनलाईनने पैसे घेतले.
काही कालावधीनंतर संतोषने मुकादम नको आता लिपिकाच्या जागेवर भरती करतो, असे सांगून आणखी काही पैसे घेतले. यावेळी फिर्यादी युगंधर यांनी रोख आणि ऑनलाईनने पैसे दिले. काही कालावधीनंतर त्याने आता ‘साहेबां’च्या सोबत ‘मॅडम’ही सहभागी झाल्या आहेत. असे सांगून पुन्हा जादा पैशाची मागणी केली. त्यानंतर काही महिन्यांनी कोल्हापुरात येवून ‘सिलेक्शन लेटर’ घेवून जा असे सांगितले. त्या पत्राचा लिफाफा हातात दिल्यानंतर पुन्हा पैसे घेतले. कालांतराने संतोषने संपर्क टाळला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
---------
‘सिलेक्शन लेटर’ बनावट

फिर्यादी युगंधर यांनी ‘सिलेक्शन लेटर’ पाहिल्यानंतर ते बनावट असल्याचे दिसून आले. त्यावर जावक क्रमांकासह इतर शासकीय पत्राचाही तो नमुना नसल्याचे दिसून आले. याबाबत संतोषला विचारणा केल्यावर त्याने हे ‘सिलेक्शन लेटर’ आहे, ‘जॉईनिंग लेटर’ देणार आहे, असेही सांगितले होते. यासाठी त्याने महापालिकेच्या सही शिक्क्याचा वापर केल्याचे दिसून आले आहे.

------

‘कोविड’ मुळे अडकलो...

फिर्यादी युगंधर हे बी.टीके (बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी) झाले आहेत. कोविडमुळे त्याची पुण्यातील नोकरी गेली होती. त्याच काळात ते घरी असल्यामुळे मुकादम, लिपिक होण्यासाठी तयार झाले. मात्र नोकरीच्या अमिषाने ते टप्प्याटप्प्याने फसत गेले. याबाबत सांगताना युंगधर म्हणाले की, ‘कोविडमुळे फसलो. त्यावेळची परिस्थिती वेगळीच होती.‘वॉटर सप्लाय’ विभागात मीटर बसवण्याचे काम करतो म्हणून संशयित आरोपी संतोष सांगत होता. कोविड काळात सुद्धा त्याने आम्हाला ‘आरटीपीसीआर’ करून या असे सांगितले होते. महापालिकेच्या इमारतीत सुद्धा तो कोविड काळात बिनधास्त फिरत होता. त्याला कोणीही अडवत नव्हते. त्यामुळे तो महापालिकेत नोकरीस असल्याची खात्री आम्हाला झाली होती.
------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com