
पोलिस वृत्त बातम्या...
मारहाणप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा
कोल्हापूरः वाशी (ता.करवीर) येथे शेजाऱ्यांच्या झालेल्या वादातून दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला. अभिलाष बाळू पुजारी आणि त्यांची पत्नी ज्योती ( रा. बुडके गल्ली, वाशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी अनिता खानू पुजारी बचत गटाची बैठक करून घरी परत आल्या असता संशयित आरोपी अभिलाष बाळू पुजारी याने वीट फेकून मारली. अनिता यांनी विचारणा केली असता अभिलाषने शिवीगाळ केली. त्यानंतर अनिता घरात जावून बाहेर आल्या असता अभिलाष आणि त्याची पत्नी ज्योती यांनी शिवीगाळ व मारहाण केली. शेजाऱ्यांनी हे भांडण मिटविले. त्यानंतर फिर्यादी पुन्हा घरात गेल्यानंतर संशयित आरोपींनी घरात जावून मारहाण केली.
--------
नवीन वाशी नाका येथे बेकरीत चोरी
कोल्हापूरः पत्रा उचकटून चोरट्याने नवीन वाशी नाका येथे महालक्ष्मी बेकर्स अँड जनरल स्टोअर्समधील रोख पाच हजार रुपयांसह १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी रात्री साडेदहा ते बुधवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडल्याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
करवीर पोलिसांनी सांगितले की, बेकरीचा पाठीमागील पत्रा उचकटून चोरट्याने बेकरीतील साहित्य लंपास केले. यामध्ये बेकरीतील खाद्यपदार्थ, आईस्क्रीम, रंगपंचमीच्या निमित्ताने विक्रीसाठी आणलेले रंग आणि रोकड पळविली. याची फिर्यादी बेकरी मालक प्रणिता प्रकाश माळी यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.
-----
शिवाजी पूल परिसरात चोरी,
४२ हजारांच्या ऐवजावर डल्ला
कोल्हापूरः शिवाजी पूल परिसरातील घरातून चोरट्याने तिजोरीतील ४२ हजारांचा ऐवज लंपास केला. याची फिर्याद घरमालक सौरभ अशोक मुळे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मुळे यांच्या राहत्या घरात उघड्या दरवाजातून चोरट्याने घरात प्रवेश केला. तिजोरीतील आठ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, २.६७० ग्रॅमची सोन्याची दोन कर्णफुले, चार ग्रॅमची सोन्याची अंगठी असा सुमारे ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.