
८ लाखांची लाच घेताना २ पोलिस कर्मचाऱ्यांना अटक
(फोटो - ८८२९६)
ःनागेश मात्रे, रूपेश कुंभार
सहायक निरीक्षक, हवालदार
‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
---
गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच, दोघांना कोठडी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः क्रिप्टो करन्सीमधील फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी आज सहायक पोलिस निरीक्षक आणि हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. सहायक निरीक्षक नागेश सिद्धराम मात्रे (वय ३८, मूळ रा. श्रीनगर, मजरेवाडी, जि. सोलापूर, सध्या रा. पोलिस क्लब, बावडा), हवालदार रूपेश तुकाराम कुंभार (४१, मूळ रा. सडोली खालसा, ता. करवीर, सध्या रा. कलिकतेनगर, पुईखडी) अशी या प्रकरणात अटक झालेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची कोठडी दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी दोघांनाही निलंबित केले आहे.
याबाबत पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेली माहिती अशी ः ब्लॅक ॲरो या क्रिप्टो करन्सीद्वारे पैसे गुंतविल्यास दहा महिन्यांत गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम देणार, असे सांगून तक्रारदाराच्या नातेवाइकाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली होती. सुरुवातीचे काही महिने सर्व रक्कम ठरल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना देण्यात आली. मात्र, नंतर सिस्टिममधील काही तांत्रिक अडचणींमुळे रक्कम देणे थांबले आहे, असे गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते. त्यातील एका गुंतवणूकदाराने तक्रारदाराच्या नातेवाइकाविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, तक्रारदाराच्या भावाने आपले सगळे पैसे ठरल्याप्रमाणे परत करतो; तुम्ही अर्ज मागे घ्या, असे सांगितले. त्यानुसार दोघांनी संगनमताने तक्रार मागे घेण्याचे ठरविले. याची माहिती मात्रे आणि कुंभार यांना मिळाली. त्यांनी तक्रारदाराला तुम्ही आम्हाला आठ लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करणार, असे सांगून लाचेची मागणी केली.
याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे करण्यात आली. विभागाने काल (ता. १०) तक्रारीची पडताळणी केली. लाच मागितल्याची खातरजमा केल्यावर सापळा रचला. शिवाजी विद्यापीठाजवळील एनसीसी भवन येथे काल रात्री मात्रे आणि कुंभारने तक्रारदाराला आठ लाख रुपये घेऊन बोलावले. या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दोघांना पैसे घेताना पकडले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची कोठडी देण्यात आली.
जुना राजवाडा पोलिस ठाण्याचीच झडती
मात्रे आणि कुंभार यांना अटक केल्यावर दोघांच्याही घराची झडती घेण्यात आली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांनी तेथेही झडती घेतली. या वेळी मात्रेच्या कक्षातील संगणक व काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.
सांगली विभागाची कारवाई
या प्रकरणातील तक्रारदाराने लाचलुचपत विभागाच्या पुण्यातील कार्यालयात तक्रार केली होती. त्यांनी याची माहिती सांगली लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाला दिली. त्यांनी तक्रारीची खातरजमा करून कारवाई केली. सांगली विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, ऋषीकेश बडणीकर, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, उमेश जाधव यांनी कारवाई केली.
अडीच महिन्यांत ११ कारवाया
गेल्या अडीच महिन्यांत विभागाने ११ कारवाया केल्या. यात नऊ शासकीय कर्मचारी आणि तीन नागरिकांना अटक केली. नऊ शासकीय कर्मचाऱ्यांपैकी सात पोलिस कर्मचारी आहेत.
जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शांतता
जुना राजवाडा पोलिस ठाण्याचीही झडती घेतल्याने सायंकाळी पोलिस ठाण्यात शांतता होती. कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीची लगबग नव्हती. गुन्हेशोध पथकाच्या कक्षात सर्वजण बसून होते.