भाजप कार्यकारी बदलाचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप कार्यकारी बदलाचे संकेत
भाजप कार्यकारी बदलाचे संकेत

भाजप कार्यकारी बदलाचे संकेत

sakal_logo
By

भाजप कार्यकारिणी बदलाचे संकेत

महानगर, ग्रामीण दोन्ही अध्यक्ष बदलणार

ओंकार धर्माधिकारी, सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ११ : भारतीय जनता पक्षाची महानगर (शहर) आणि जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणी बदलणार आहेत. पुढील दोन महिन्यात हे बदल होणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बदलात जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्ष यांच्यासह आणखी काही आघाड्यांचे प्रमुख बदलण्यात येणार आहेत. राज्यातील १६ ठिकाणी असे बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता शहर आणि ग्रामीण भागात नव्या जिल्हाध्यक्षांचा शोध सुरू झाल्याचे समजते.
राज्यात सत्ता बदलानंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतही बदल झाले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी मंत्रिपदावर लागल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी लगेचच कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर या बदलांच्या चर्चेला सुरुवात झाली. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्यावेळी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावन्नकुळे यांनी कार्यकारिणी बदलाचा पुनरुच्चार केला. विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने हे बदल केले जाणार आहेत. शहराध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, उपाध्यक्षपदासाठी सचिन तोडकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांची नावे चर्चेत आहेत. तर ग्रामीण कार्यकारिणीसाठी सध्याचे संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजवर्धन निंबाळकर आणि माजी आमदार अमल महाडिक यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्याचबरोबर महानगर आणि ग्रामीण दोन्ही कार्यकारिणीतील संघटन सरचिटणीस आणि महिला आघाडी अध्यक्षही बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्षांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा कार्यकर्त्यांच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय बनला आहे.
----------------

समरजितसिंह घाटगेंना मुदवाढीची शक्यता

ग्रामीण जिल्हाध्यक्षांसाठी जरी नावांची चर्चा सुरू असली तरी विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामीण भागात नवे नेते, कार्यकर्ते पक्षाशी जोडले असून, त्यांनी चांगली संघटनबांधणी केली आहे. त्यामुळे त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-------------------------

खासदार महाडिकांची भूमिका निर्णायक
जिल्ह्याची नवी कार्यकारिणी निवडताना खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यांच्या सल्ल्यानेच नवे पदाधिकारी निवडले जातील, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.