घरफाळा

घरफाळा

(महापालिका व पैसे टाका)

घरफाळ्याची अनेक प्रकरणे लटकली
---
चौकशीच्या धाकामुळे जुन्यांना हातच नाही; वरिष्ठांकडून सावध पवित्रा
उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः घरफाळा कमी करण्यासाठी जरी योग्य कारण, कागदपत्रे दिली तरी भविष्यात चौकशीचा फेरा नको म्हणून सध्या घरफाळा विभागातील जुनी कामे हातात घेण्याचे धाडस अधिकारी-कर्मचारी करीत नाहीत. कुणी सतत पाठपुरावा केला तर प्रस्ताव तयार करून वरिष्ठांपर्यंत पाठविला जातो. पण, वरिष्ठही हात पोळायला नको म्हणून कनिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यास परत सांगत आहेत. त्यामुळे जुन्या फाईल बंद व नव्याची कार्यवाही इतकेच काम होत आहे. त्यातून शहरवासीयांची घरफाळ्याबाबतची अनेक प्रकरणे लटकलेल्या स्थितीत आहेत.
घरफाळा विभाग गेल्या काही वर्षांपासून घोटाळ्याच्या प्रकरणांमधून चर्चेला आला आहे. अनेक मिळकतींची कोट्यवधींची प्रकरणे सध्या ऐरणीवर आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे, कारवाई होत आहे, काही निलंबित झाले, काही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. ही सर्व स्थिती पाहून घरफाळा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दडपण वाढले. मुळात हा विभाग चिरीमिरीसाठी प्रसिद्ध असल्‍याची चर्चा असते. त्यामुळे या दडपणाचा अर्थ दुसऱ्या बाजूने त्यांचे हात बरबरटले असल्याचा काढला जात असल्याचे चित्र आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या मिळकतींसाठी यंत्रणा आहे. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या ‘कामाचा’ अनुभव शहरवासीयांना आलेला असतो. त्यावरून साऱ्या विभागाची प्रतिमा तयार झाली आहे. त्यासाठी योग्य ती प्रशासकीय चौकशी, उपाययोजना कराव्या लागतील. पण, सध्याच्या वातावरणामुळे केवळ वसुली व नोटीस देणे इतक्यापुरते मर्यादित काम केले जात आहे.
घरफाळा लावताना व काही कालावधीनंतरची स्थिती वेगवेगळी होऊ शकते. भाडेकरूला दिलेली खोली, गाळा रिकामा होऊ शकतो. त्यामुळे कूळ वापर बदल होऊन मालक वापर होऊ शकतो. त्यातून घरफाळा कमी होतो. जुन्या घराचे बांधकाम पडल्याने क्षेत्र कमी करणे, तसेच नवीन बांधकाम झाल्यावर जुन्या घराचा व नव्या घराचा करदाता क्रमांक वेगवेगळा होऊन दोन्ही बिले सुरू राहणे, त्यातील जुने बिल बंद करणे, फोड करून देणे अशी कामे नित्य सुरू राहतात. त्यासाठीची कागदपत्रे, कारणे तपासून ती नियमितही केली जातात. पण, गेल्या काही वर्षांपासून विभागात सुरू असलेल्या चौकशीच्या फेऱ्यामुळे अशा जुन्या प्रकरणांना हातच घातला जात नाही. पूर्वीची प्रकरणे योग्य असली तरी आता का करायचे, याची शंका वरिष्ठांकडून निर्माण केली जाते. त्यामुळे कुणी पाठी लागले तर प्रस्ताव तयार करायचा व निर्णयासाठी वरिष्ठांकडे पाठवायचे काम होत आहे. वरिष्ठांकडूनही आता वादग्रस्त काही होऊ नये, याचीच काळजी घेतली जात असल्याने किचकट प्रकरणांवर तुमच्या पातळीवर निर्णय घेण्यास सांगितले जात आहे. ज्याचा अधिकारी ते काम कसे करणार म्हणून कनिष्ठ ती फाईल तशीच ठेवून टाकत आहेत. तसेच, काही कनिष्ठ लिपिक सोडल्यास अन्य विभागांतील कर्मचारी विभागात घेतले आहेत. त्यांना अनुभव नसल्याने अशा कामाचा निपटारा ते करू शकत नाहीत.

चौकट
दोन्ही बाजूंना फटका
या साऱ्यामुळे मिळकतधारकांची जुनी प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. त्यात निर्णय दिलेले नसल्याने महापालिकेचे उत्पन्न अडले आहे. दुसरीकडे अनेकांची योग्य प्रकरणे असतानाही केवळ या वातावरणामुळे काम केले जात नाही. त्यामुळे विनाकारण दंडव्याजाचा बोजा वाढत असल्याने शहरवासीयांना मनस्ताप होत आहे. यासाठी प्रशासकांकडून तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे.
...
चौकट
रिव्हीजनअभावी सारा घोळ
जवळपास २० वर्षे होत आली, तरी घरफाळा विभागाने रिव्हीजन केलेले नाही. त्यामुळे कोणती मिळकत कशी आहे, त्यात कमी-अधिक काय झाले आहे, याचा अंदाजच मिळत नाही. रिव्हीजन झाल्यास त्यातून जुनी प्रकरणे आपोआप निकाली निघतील. त्यासाठी निर्णय घेऊन अंमलबजावणी झाली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com