
वाढला उन्हाळा, माठही वधारले
88515
गडहिंग्लज : आठवडा बाजारात माठांना मागणी वाढली आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
वाढला उन्हाळा, माठही वधारले
मागणीअभावी आंबे उतरले; पालेभाज्या, कोंथिबिर, दोडका, ढब्बू, बिन्सही तेजीत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : येथील बाजारात वाढत्या उन्हामुळे माठांना मागणी वाढली असून दरही वधारले आहेत. भाजी मंडईत दोडका, ढब्बू, बिन्सचे दर तेजीत आहेत. पालेभाज्या, कोंथिबिरची आवक घटल्याने दर वाढले. तुलनेत कोबी, वांगी, टोमॅटो यांची अधिक आवक असल्याने दर कमी आहेत. गेल्या पंधरवड्यापासून दाखल झालेल्या आंब्यांना मागणी कमी असल्याने दर थोडे उतरले आहेत. जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक टिकून आहे.
भाजी मंडईत दोडका, ढब्बू, बिन्सला मागणी कायम असल्याने दर तेजीत आहेत. दहा किलोचा दर ४०० रुपये असा होता. कमी आवकेने हिरव्या मिरचीचा वाढलेला दर टिकून आहे. उन्हाळ्यामुळे पालेभाज्या, कोंथिबिरीची आवक कमी झाली आहे. यामुळे दरात वाढ झाली आहे. दहा ते पंधरा रुपये असा पेंढीच्या आकारानुसार दर आहे. वांगी, टोमॅटो, कोबी यांचा दर पडलेलाच आहे. लिंबूचा दर वाढला असून २ ते ३ रुपये असा नगाचा दर होता. कांदा, बटाट्याचे दर स्थिर आहेत. कांदा दर्जानुसार १० ते २० रुपये किलो आहे. बटाटा २० ते ३५ रुपये किलो आहे. लसूण ५० ते ९० रुपये किलो होता. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांना मागणी वाढली आहे. येथील नेहरू चौकात कुंभार व्यावसायिक याची विक्री करीत होते. १०० ते १५० रुपये नगाचा दर होता.
फळबाजारात सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या द्राक्षांची आवक अधिक आहे. किलोचा ४० ते ६० रुपये दर आहे. सफरचंद २००, माल्टा १००, डाळिंब, चिकू, पेरू ८० रुपये किलो आहेत. अधिक दरामुळे आंब्याला मागणी कमी झाली आहे. त्यामुळे आंब्याचे दर डझनामागे ४०० रुपयांनी कमी झाले आहेत. डझनाला १००० ते १२०० रुपये असा दर होता. स्थानिक कलिंगडाची आवक जास्त आहे. २० ते ८० रुपयांपर्यंत दर होते. जनावरांच्या बाजारात म्हशींची ८० पेक्षा अधिक आवक झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. पंचवीस ते ९५ हजारांपर्यंत दर होते. शेळ्यामेंढ्याची ६० पेक्षा अधिक आवक होऊन ५ ते १५ हजार रुपये दर होते.
---------------------
चौकट
बाजारात शुकशुकाट
रंगपंचमीमुळे बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांनी सुटी घेणे पसंत केले. त्यामुळे बहुतांशी दुकाने बंद होती. तसेच वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सत्रात सर्वानींच बाहेर पडणे थांबविले आहे. परिणामी, आठवडा बाजारात दिवसभर शुकशुकाट दिसला. केवळ सायंकाळच्या सत्रात बाजारात जेमतेम वर्दळ दिसली.