
सप्तरंगासह कोरड्या रंगांचीच उधळण
88550
इचलकरंजी : शाळा कॉलेजला सुटी असल्याने युवतींनी गटा-गटाने सायकलने फिरून मित्र- मैत्रिणींना घरी जाऊन रंगवले.
सप्तरंगासह कोरड्या रंगांचीच उधळण
रंग लावण्यासाठी चढाओढ; गल्लोगल्ली संगीताच्या तालावर तरुणाईचा जल्लोष
इचलकरंजी, ता. १२ : एकमेकांना रंग लावण्यासाठी सुरू असलेली चढाओढ तर कुठे डीजेच्या तालावर थिरकत अंगावर रंगाचे फवारे झेलणारे आबालवृद्ध अशा जल्लोषमय वातावरणात शहरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा झाला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारही रंगांची उधळण करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला भरते आल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाण्याची भीषणता जपत त्वचेला इजा होणार नाही, अशा कोरड्या रंगांचा वापर वाढल्याचे स्पष्टपणे दिसले. शहरात गल्लोगल्लीत संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई रंगात न्हाऊन निघालेला बालचमू, महिला आणि युवतींचा लक्षणीय सहभाग असेच आजच्या रंगपंचमीचे चित्र होते. दुचाकी वरून फिरणारे घोळके पाण्याच्या फवाऱ्यांत आणि कोरडे रंग मुक्तपणे उधळत होते. भागा-भागात नागरिक रंगांत न्हाऊन निघाले. विविध ठिकाणी सकाळी दहानंतर रस्ते फुलले. अनेक ठिकाणी डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेधुंदपणे नाचत होती. लहानथोरांपर्यंत सर्वांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. आतुरतेने वाट पाहणारे चिमुकले सकाळी आठपासून पिचकाऱ्या आणि रंग घेऊन रस्त्यावर आले. फेव्हरीट कार्टूनच्या आकाराच्या पिचकाऱ्यांतून ते लहान-मोठ्या साऱ्यांवर रंग टाकत होते.
शाळा-महाविद्यालयांना आज सुटी असल्याने तरुणाईने मोटारसायकलवरून रंगांची उधळण करत आनंद लुटला. सारे रस्तेही रंगात न्हाऊन निघाले. गटा-गटाने त्यांची रंगपंचमी सुरू होती. लाल-गुलाबी, पिवळ्या-निळ्या सुक्या रंगांची उधळण करीत लहान-थोर साऱ्यांनी जल्लोष केला. सुटीचा दिवस असल्याने उत्साहाला उधाण आले. शहरात पाणीटंचाई असल्याने बॅरेलमध्ये बुडवून व पाण्यासह रंग खेळण्याचा प्रकार फारसा दिसला नाही. बाजारपेठेत निम्म्याहून अधिक दुकाने आज बंद राहिली. कामगार, मालकांनीही बाजारात रंग खेळले. त्यात हमालांनीही भाग घेतला.
-----
पोलिसांची रंगपंचमी रस्त्यावर
रंगपंचमीला तरुणाईच्या उत्साहाला पारावार राहत नाही. त्यामुळे अनेकदा अतिउत्साही तरुणाईकडून कायदा धाब्यावर बसवला जातो. त्यांच्यावर नियंत्रण राहावे यासाठी पोलिसांनी रस्त्यावर तळ ठोकला होता. ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. मद्यपी तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत होती. रंगात माखलेले चेहरे धुण्यासाठी नदीघाटाकडे धाव घेत होती. त्यामुळे या भागांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.