
रेल्वेची कंजूशी एक्सप्रेस
‘उच्चश्रेणी’तील सुविधा वाढवल्या; सर्वसामान्य प्रवाशांच्या हिरावल्या
-
रेल्वेच्या महसुलाला फटका
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. १२ ः रेल्वेच्या बदलत्या व्यवसायिक धोरणामुळे मोठ्या प्रमाणात सुविधांमध्ये बदल झालेत. त्यातून उच्चश्रेणी प्रवासी वर्गाला आकर्षीत करणाऱ्या सुविधात वाढवल्या. त्या बदल्यात सर्वसामान्य प्रवासी वर्गाच्या सुविधा हिरावल्या आहेत. परिणामी प्रवाशांना गैरसोय, मनस्ताप सोसावा लागत असल्याने काही वेळा प्रवास रद्द केला जातो. यात रेल्वे व प्रवाशांचे दुहेरी नुकसान होत आहे.
रेल्वेच्या एकूण प्रवासी वर्गात ६५ टक्के वर्ग सर्वसामान्य आहे तर ३५ टक्के वर्ग उच्चश्रेणीतील आहे. सर्वसामान्य वर्ग मोठ्या प्रमाणात जनरल किंवा स्लिपर कोचने प्रवास करतो. कोल्हापूरातून सुटणाऱ्या सात रेल्वेगाड्यापैकी दोन पॅसेंजर वगळून उर्वरित पाच गाड्यांना पूर्वी चार जनरल डबे व १० स्लिपर कोच डबे होते. त्यापैकी जनरलचे दोन व स्लिपर तिन डबे कमी केले आहेत. त्याऐवजी एसीचे तिन डबे वाढवले. एसी वर्गातून प्रवास करणाऱ्या वर्गाचे तिकीट भाडे जास्त असल्याने महसुल वाढेल असा हिशेब रेल्वेचा असू शकेल.
परिणामी दिर्घपल्ल्याच्या प्रवासाला निघताना जनरलची एकूण तिकीटे कमी झाली. दोन डब्याची गर्दी एका डब्यात वाढली. पैसे कमी असलेल्यांना प्रवास रद्द करावा लागतो. काहीजन जनरलचे तिकीटकाढून सिल्परमध्ये जातात. सिल्परची संख्या कमी केल्याने तिथेही जागा मिळणे मुश्कील होते. यातून वाद वाढले. तिकीट तपासणी वेळी फरकाची रक्कम मोठ्या प्रमाणात भरावी लागते. यातही प्रवाशाला नुकसान होते. एसी क्लासचे तिकीट काढण्यासाठी ४० टक्क्यांनी भाडे जास्त असल्याने सामान्य वर्गाला परवडत नसल्याने कोंडी होते.
स्लिपरकोच व जनरल डब्याची संख्या कमी केल्याने नियमित आरक्षण किंवा तत्काळमध्ये तिकीट सहजपणे मिळत नाही. वेटींगसाठी पूर्वी फक्त ४० ते ५० तिकीटे दिली जात होती. मात्र, सद्या वेटींग तिकीटे दुप्पट दिली जातात. अचानकपणे प्रवास रद्द करणाऱ्यांची संख्या नगन्य असते. त्यामुळे वेटींग तिकीट घेऊनही बसण्यासाठी लवकर जागा मिळणे मुश्कील होते. त्यामुळे वेटींगचे तिकीट नको म्हणत प्रवास रद्द केला जातो. यात प्रवासी गैरसोय होते. तसेच रेल्वेच्या महसुलाला फटका बसत आहे.
चौकट
११ थांब्यावर गाडी थांबवणे बंद
कोल्हापूर ते मुंबई प्रवासात गांधीनगरसारख्या ११ थांब्यावर गाडी थांबवणे बंद केले. वास्तवीक याच थांब्यावरून जनरल व स्लिपर कोचचे सर्वाधिक प्रवासी असतात. यातील काहीजण जनरलमधून स्लिपर मध्येही जातात मात्र गाडीच थांबत नसल्याने तास-दोन तासाचा प्रवासी वर्ग कमी होत आहे.