
रंगपंचमी
88609
........
‘त्यांच्या’चेहऱ्यांवर फुलले हास्य
-
मातोश्री वृद्धाश्रमात ‘यिन’तर्फे रंगोत्सव
कोल्हापूर, ता. १२ : ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्याला नैसर्गिक रंग लागले. फुलांच्या पाकळ्यांची उधळण झाली. प्रत्येक जण एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावू लागला आणि रंगोत्सवात न्हालेल्या चेहऱ्यांवर अलगद हास्य फुलले. निमित्त होते सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आयोजित रंगपंचमीचे. शिंगणापूर रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमात त्याचे आयोजन केले होते.
मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय व नातलगांसमवेत रंगपंचमी दरवर्षी साजरी केली जाते. यंदा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसमवेत रंगपंचमी साजरी करण्याचा निर्धार तरूणाईने केला. नैसर्गिक रंग, फुलांच्या पाकळ्या घेऊन त्यांनी वृद्धाश्रमात प्रवेश केला. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर रंग लावले. त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत जल्लोष केला. त्यामुळे वातावरणात उत्साह भरला आणि ज्येष्ठ नागरिकही एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावू लागले. तरूणाईने त्यांना जिलेबी, द्राक्षे, पेढे वाटून रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला.
वृद्धाश्रमाच्या सूर्यप्रभा चिटणीस, वैशाली राजशेखर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच वृद्धाश्रमाची माहिती दिली.
यिनची जिल्हा कार्याध्यक्ष राजलक्ष्मी कदम हिने रंगपंचमीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य, हाच आमच्यासाठी महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगितले.
यिनचे सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, मयूर खोत, साईनाथ मोहिते, अथर्व चौगुले, श्रीशैल पाटील, ओंकार रसाळ, शिवानंद पोळ, नीलेश बाऊस्कर, समृध्दी टिपूगडे, सौरभ साखरे, सुरेखा कांबळे, सई साळोखे, तानिया मुरसल, तीर्था मोळे, श्रुती कदम, स्नेहल परीट, हर्षदा कदम, चेतना रांगी, पार्थ मोळे, अथर्व जमनूरे, समर्थ पाटील, अमन हवालदार, अनिकेत पाटील, अभिजित मोटे, वैभव गुजर, नवनाथ सरगर यांनी संयोजन केले.