‘गोडसाखर’चा आगामी हंगाम ‘गोड’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोडसाखर’चा आगामी हंगाम ‘गोड’
‘गोडसाखर’चा आगामी हंगाम ‘गोड’

‘गोडसाखर’चा आगामी हंगाम ‘गोड’

sakal_logo
By

‘गोडसाखर’चा आगामी हंगाम ‘गोड’
गडहिंग्लज कारखाना : शेतकरी, उत्पादकांना ऊस नोंदवण्याचे केले आवाहन
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असलेल्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याचा (गोडसाखर) आगामी गळीत हंगाम ''गोड'' होण्याचे संकेत व्यवस्थापनाने शेतकऱ्‍यांना दिले आहेत. कार्यक्षेत्रातील उत्पादकांना पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे नोंदवण्याचे आवाहन केल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कारखाना निवडणुकीत सत्तारुढांना सभासदांनी पायउतार करून आमदार हसन मुश्रीफ व डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला सत्तेवर बसवले आहे. निवडणुकीसाठी गेलेला कालावधी, कारखान्यातील जुन्या मशिनरींची कमी झालेली कार्यक्षमता आणि अर्थसाहाय्य मिळण्यात होणारा उशीर आदी प्रमुख कारणामुळे २०२२-२३ च्या हंगामात कारखान्यात उसाचे गाळप झालेच नाही. मात्र आगामी हंगाम सुरु करण्याबाबतची पावले पडायला सुरुवात झाली. निवडणुकीतील आश्‍वासनानुसार नव्या सत्तारुढांनी इथेनॉल प्रकल्प व कारखाना आधुनिकीकरणासाठी हालचाली सुरू केल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून त्याचा डीपीआर बनवला. २१४ कोटींचा हा आराखडा अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण व संचालकांनी केडीसीसी बँकेला सादर केला. त्यानंतर बँकेचे पथक कारखान्याला भेट देवून गेल्याचे समजते. कारखान्याची पाहणी करुन या पथकाने आपला अहवाल बँकेला सादर करेल. त्यानंतर हा प्रस्ताव बोर्ड मीटिंगमध्ये येईल.
टप्प्याटप्प्याने अर्थसहाय्य मिळेल याचे संकेत असले तरी अर्थसहाय बाबतचा निर्णय बोर्ड मीटिंगमध्येच होणार असल्याने त्याची खात्री आताच देणे अडचणीचे आहे. दरम्यान, कारखाना व्यवस्थापनाने मात्र आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने अस्तित्वातील मशिनरींची रिपेअरी व किरकोळ कामे करून घेण्याची धडपड सुरू असून आगामी हंगामात कारखान्याची चिमणी पेटवण्याचे संकेत मिळत आहेत. उत्पादकांना ऊस नोंदवण्याचे केलेल्या आवाहनामागे व्यवस्थापनाची त्यादृष्टीनेच वाटचाल सुरू असल्याच्या हालचाली दिसत आहेत. कारखान्याच्या आवाहनामुळे शेतकरी उत्पादकांत आगामी हंगामाची चर्चा सुरू असून त्याकडेच आता डोळे लागलेले आहेत.
--------------
ईडी चौकशीत गोडसाखर चर्चेत...
दहा वर्षांपूर्वी कारखाना बंद पडण्याची स्थिती असताना आमदार मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने ब्रिस्क कंपनीला कारखाना चालवण्यासाठी दिला. मात्र या कंपनीला केडीसीमधून अर्थसाहाय्य झाल्याचा आरोप ईडीकडे झाला आहे. त्यादृष्टीने ईडीच्या पथकाकडून वारंवार चौकशी केली जात आहे. सरसेनापती व गोडसाखर कारखान्याबाबत बँकेतील व्यवहारांचीही ईडीने मध्यंतरी तपासणी केली आहे. यामुळे गोडसाखर कारखाना अधिकच चर्चेत आला आहे.