रंगात रंगले गडहिंग्लजकर..!

रंगात रंगले गडहिंग्लजकर..!

gad127.jpg
88567
गडहिंग्लज : रंगपंचमीनिमित्त शहरात दुचाकीवरून फेरफटका मारत रंगांची उधळण करताना युवक. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------------
रंगात रंगले गडहिंग्लजकर..!
रंगपंचमी उत्साहात; युवती, महिलांचाही सहभाग
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : कुठे कोरड्या रंगांची उधळण तर कुठे ओल्या रंगाची उडणारी पिचकारी, आपलाच नाही तर परकाही आपलाच मानून लावले जाणारे रंग, एकमेकांना लागणारे रंग वेगवेगळे असले तरी सर्वांना मिळणारा आनंद सारखाच होता, निमित्त होते रंगपंचमीचे. गडहिंग्लजकर रंगासोबत आनंदातही न्हाऊन निघाल्याचे दिसून आले.
रंगपंचमीचे विशेषत: युवक व शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकर्षण. गडहिंग्लज शहरासह ग्रामीण भागात रंगांचा उत्सव पाहिल्यानंतर रंगपंचमीचे आकर्षण किती असते याची प्रचिती आली. शहरात सकाळी आठपासूनच युवकांचे जथ्थेच्या जथ्थे घराबाहेर पडल्याचे दिसून आले. चौकाचौकांत थांबून एकमेकांना रंग लावले जात होते. त्यांच्याकडून कोरड्या रंगांचा अधिक वापर केला जात असल्याचे दिसून आले. नव्याने सहभागी होणाऱ्या युवकाला सारेजण रंगात न्हाऊ घालत होते. काही युवक तर डोकीच्या केसापासून ते पायापर्यंत रंगात न्हाऊन निघाल्याचे दिसून येत होते. विद्यार्थ्यांचा उत्साह वेगळाच होता. त्यांच्याकडून ओल्या रंगांचा अधिक वापर सुरू असल्याचे दिसून आले. रंगोत्सव खेळण्यासाठी पिचकारीचा वापर केला जात होता. अगदी पाणीसुद्धा एकमेकांच्या अंगावर मारले जात होते. रंगपंचमी खेळण्यात युवतीही मागे नसल्याचे दिसून आले. आपापल्या चौकात एकत्र येत त्यांनी रंगपंचमी खेळली. अगदी काही युवती दुचाकीवरुन फेरफटका मारतानाही दिसून आल्या. ग्रामीण भागातील चित्र काही वेगळे नव्हते. नेसरी भागात धुलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. हा भाग वगळता रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी चौका-चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
------
हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर
अगदी परिचित व्यक्तीलाच ओळख पटावी अशी त्यांची अवस्था होती. आठ-दहा जण एकत्र येत शहरातून दुचाकीवरुन फेरफटका मारला जात होता. वाटेत भेटणाऱ्यांना रंग लावला जात होता. ठिकठिकाणच्या चौकांमध्ये डॉल्बीवरील उडत्या चालीच्या गीतांच्या तालावर थिरकत तरुणाई रंगांची उधळण करीत होती. मोटारसायकलवरून तिघे-चौघे बसून जात असताना हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाईवर पोलिसांची करडी नजर होती. यामुळे काहींना शिक्षेचा प्रसादही मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com