ह्युमन टच स्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ह्युमन टच स्टोरी
ह्युमन टच स्टोरी

ह्युमन टच स्टोरी

sakal_logo
By

केएमटी फोटो वापरावा

ह्युमन टच
प्रतिनिधी

वाट पाहणे हीच आयुष्यभराची ड्यूटी
केएमटीतील रोजंदारी कर्मचाऱ्यांची व्यथा; अनेक उंबरे झिजवूनही न्यायाची प्रतीक्षा

कोल्हापूर, ता. १३ ः पावसाळा असो की, कडाक्याची थंडी, पहाटे उठून ऑफिस गाठायचे. कायमच्या कर्मचाऱ्याची अचानक दांडी असेल तर त्याचे काम ज्येष्ठतेनुसार हातात पडते. ज्येष्ठता नसेल तर दुपारपर्यंत कुणामुळे ड्यूटी मिळते का पाहायचे, मिळाली तर पगाराची खात्री अन्यथा बिनपगारी दिवस गेल्याची खंत. पोटासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यालयात जाऊन वाट पाहायची, अशी दररोज ड्यूटीची वाट पाहत केएमटीतील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचे आयुष्य जात आहे. मंत्री, लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील अधिकारी, न्यायालये असे अनेक उंबरे वारंवार झिजवूनही त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण डोकावलेला नाही.
महापालिका प्रशासनाने शहरवासीयांच्या सुविधेसाठी केएमटी उपक्रम राबवला. त्यातून चांगली सेवा देण्यासाठी अधिकारी नेमले गेले; पण बससेवा ज्या वाहक-चालक या दोन प्रमुख चाकांवर चालते, तीच चाके व्यवस्थित ठेवण्याचे काम केले गेलेले नाही. बससंख्येच्या प्रमाणानुसार कायम चालक-वाहकांची संख्या नसल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मार्ग अवलंबण्यात आला. रोजगाराची उपलब्धता व दुसरीकडे कायम होण्याच्या आशेने अनेक चालक-वाहकांनी रोजंदारीचा मार्ग स्वीकारला. १९९२ मध्ये रूजू झालेल्या रोजंदारीवरील चालक-वाहकांना ड्यूटी मिळाल्यास प्रतिदिन २४ रुपये ५० पैसे मिळत होते. तीस वर्षांच्या कालावधीत हा टप्पा आता प्रतिदिन पाचशे रुपयांपर्यंत आला आहे. इतर ठिकाणाच्या रोजगारापेक्षा तो कमी असला तरी कायम होण्याची आस त्यांना इतर ठिकाणी जाऊ देत नाही.
अशा प्रकारे त्या वर्षी २०० च्या आसपास चालक-वाहक रोजंदारीवर घेतले होते. त्यांतील काही निवृत्त झाले, काहींचे निधन झाले. काही कर्मचारी तीस-तीस वर्षे ड्यूटी करून आता निवृत्त होत आहेत; पण कायम झालेले नाहीत. महिन्यातील २५ दिवस भरले तर साडेबारा हजार मिळतात. कर्ज, प्रॉव्हिडंट फंडाच्या कटींगमध्ये त्यातील काही जातात. त्यात जर भाड्याने राहणारा कर्मचारी असल्यास खर्चाचा खड्डा आणखी मोठा होतो. उरलेल्या आठ हजारांत घरखर्च, मुलांचे शिक्षण याचा खर्च करावा लागत आहे. यातून या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे स्वतःचे व कुटुंबाचे योग्य पालनपोषण नक्कीच शक्य नाही. निवृत्तीच्या उंबरठ्यावर ठेपलो तरी कायम झालेलो नाही, याची फार मोठी बोचणी त्यांना लागून राहतेच. शिवाय निवृत्तीचे आयुष्य समाधानाने जगण्याऐवजी कुठेतरी काम पाहून ते कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘काहीही उपयोग झाला नाही’
रोजंदारी वाहक म्हणून संपूर्ण नोकरी करणारे अनिल चव्हाण यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांच्या बोलण्यात केवळ आणि केवळ त्रागा जाणवत होता. ते सांगत होते, ‘‘३१ वर्षांची सेवा बजावून १८ मार्चला मी निवृत्त होणार आहे. १९९६ मध्ये २४० दिवस भरल्यानंतर तेव्हापासून कितीदा तरी कायम होण्यासाठी सहकाऱ्यांबरोबर प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी असोत वा अधिकारी; पण काहीही उपयोग झाला नाही. आता २०० मधील ३३ जण राहिले आहेत. माझ्यानंतर त्यांना तरी न्याय मिळणार की नाही हे माहिती नाही.’’