
तीन लाख शेणीदान
88621
महापालिकेला तीन लाखांहून अधिक शेणी दान
-
संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचा उपक्रम
कोल्हापूर, ता. १२ ः संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे महापालिकेला तीन लाखांहून अधिक शेणी दान करण्यात आल्या. समितीतर्फे २०१७ पासून हा उपक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत लोकसहभागातून जमा झालेल्या १२ लाख शेणी स्मशानभूमीला दान केल्या आहेत.
होळीच्या पार्श्वभूमीवर जमलेल्या तीन लाखांहून अधिक शेणी यंदा आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रमिला देशमुख यांच्या हस्ते प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकदे सुपूर्द करण्यात आल्या. आमदार पाटील म्हणाले, की ‘होळी करा लहान आणि शेणी करा दान’ हा उपक्रम राबविणारे माजी नगरसेवक देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य आदर्शवत आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास नेहमीच सहकार्य राहील. उपनगरांच्या एकोप्यामुळेच असे सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने घडत आहे. आमदार जाधव यांनीही उपक्रमाचे कौतुक केले. तरुण मंडळे, संस्था, तालीम मंडळे, जनतेच्या सहभागामुळेच उपक्रम यशस्वी झाल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. रिया रोहन सरनाईक, वैष्णवी किरण पाटील या बालिकांसह संजय जाधव, मंगल कांबळे, सुयोग मगदूम आदी सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राची मंडलिक, सूरज देशमुख, उपायुक्त रविकांत आडसूळ, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाटील, संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित खतकर, इजाज नागरकट्टी, रोहित गाडीवडर, आनंदा पाटणकर, गुरुप्रसाद जोशी, किरण पाटील, संदीप मगदूम, राहुल जाधव आदी उपस्थित होते. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित खतकर यांनी आभार मानले.