
रंगोत्सव
88626
---
अमाप उत्साहात रंगला रंगोत्सव
कोल्हापूर, ता. १२ : हिंदी-मराठी गीतांवर थिरकणाऱ्या तरुणाईने नैसर्गिक रंगांची उधळण करीत रंगपंचमी आज धडाक्यात साजरी केली. सप्तरंगांत न्हाऊन निघालेल्या तरुणाईचा जल्लोष सर्वत्र अनुभवायला मिळाला. मित्र-मैत्रिणींना रंग लावण्यासाठी धावणाऱ्या मित्रांचा जथ्था चौका-चौकांत ठिय्या मारून होता. सामाजिक उपक्रमांची जोड देत काही संस्था-संघटनांनी रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला.
आठवड्याच्या सुटीच्या दिवशी अर्थात रविवारी रंगपंचमी आल्याने नागरिकांनी त्याची जय्यत तयारी केली होती. काही जणांनी थेट शहराबाहेर जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखला, तर रंगोत्सवात न्हाऊन जाण्यासाठी बालचमू सकाळीच सज्ज होता. जुने कपडे परिधान करून तो गल्लोगल्ली मित्र-मैत्रिणींना रंग लावण्यासाठी फिरत होता. पालक वर्गाने नैसर्गिक रंगाला प्राधान्य दिल्याने बालचमूच्या हातात तेच रंग दिसत होते. अंगावर पाणी उडवत ते रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटत होते. घरातील कामे आवरून त्यात महिला वर्गही सहभागी झाला. तरुणाईने संस्था-संघटना व मंडळांच्या परिसरात ध्वनिक्षेपक लावले. त्यावर हिंदी-मराठी गीतांवर तरुणाई थिरकली.
महाविद्यालयीन तरुणाई आपापल्या मित्र-मैत्रिणींना रंग लावण्यासाठी दुचाकी व चारचाकीत स्वार होऊन दहानंतर बाहेर पडली. काही जण थेट रंगपंचमीच्या ‘इव्हेंट’मध्ये पोचले. संगीताच्या ठेक्यावर त्यांनी नृत्य केले. शहरातील चौका-चौकांत तरुणाईचे जथ्थे दुपारपर्यंत थांबून होते.
चौकट
विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई
रंगपंचमीमुळे शहरातील दुकानांचे शटर बंद होते. त्यात दुपारी रणरणत्या उन्हातही विनापरवाना वाहन चालविणाऱ्या तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. त्यांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अडवून कारवाई केली.
विद्यापीठ प्रशासनाचा निषेध
कोल्हापूर ः रंगपंचमी दिवशी आम्हाला वसतिगृहात कोंडले. सुरक्षारक्षकांनी कारवाईचा धाक दाखविला, असा आरोप करत काही विद्यार्थ्यांनी आज शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. भारतीय परंपरेतील सण हा विद्यार्थ्यांनी साजरा नाही करायचा, तर नेमके करायचा कुणी ?, असा प्रश्न पडला असल्याची प्रतिक्रिया गौरव ससे, दिग्वीजय गरड या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणी सोशल मीडियावरून निषेध नोंदवला आहे. दरम्यान, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत रंगपंचमी दिवशी बाहेरील विद्यार्थी विद्यापीठ कॅम्पसमध्ये येवून दंगा करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना मज्जाव केला आहे. वसतिगृह परिसरात रंगपंचमी खेळण्यास बंदी घातलेली नाही. कॅम्पसमधील विद्यार्थिनींनी त्यांच्या वसतिगृहात रंगपंचमी साजरी केली आहे.