
आजरा ः विहीरीत पडून मुलीचा मृत्यू
88708 कार्तिकी सुतार
...
विहिरीत पडून आजऱ्यात
शाळकरी मुलीचा मृत्यू
आजीसमोरच घडली घटना ः म्हशीचा धक्का लागल्याने दुर्घटना
आजरा, ता. १२ ः येथील शाळकरी मुलीचा आज विहिरीत पडून मृत्यू झाला. कार्तिकी सचिन सुतार (वय १४, रा. भारत नगर, आजरा) असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. म्हैस धुताना धक्का लागल्याने ती विहिरीत फेकली गेली. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. घटनास्थळी असलेल्या कार्तिकीच्या आजीने आरडाओरडा केला; पण परिसरात कोणीच नसल्याने ती नातीला वाचवू शकली नाही. शिवराज आप्पासाहेब सुतार यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कार्तिकी ही व्यंकटराव हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आज, रविवार सुटीचा दिवस असल्याने ती आजी चंद्रभागा सुतार यांच्यासोबत माद्याळकर यांच्या शेतामध्ये म्हैस व शेळ्या घेऊन चारावयास गेली होती. चंद्रभागा या पलीकडील शेतात शेळ्या चारत होत्या. कार्तिकी ही विहिरीतील पाणी काढून म्हैस धूत होती. म्हैस अचानक फिरल्याने कार्तिकीला जोराचा धक्का बसला व ती विहिरीत फेकली गेली. या वेळी झालेल्या आवाजाने आजी चंद्रभागा विहिरीकडे धावत आली. तिने कार्तिकीला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र, त्या दरम्यान या परिसरात कोणीही नव्हते. काही वेळाने आवाज ऐकून लगतच्या शेतात काम करत असलेले शेतकरी घटनास्थळी धावत आले. तोवर वेळ निघून गेला होती. कार्तिकीला पाण्यातून बाहेर काढण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मागे आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. तिच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस हवालदार संतोष घस्ती अधिक तपास करीत आहेत.