महिला प्रीमियर लीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला प्रीमियर लीग
महिला प्रीमियर लीग

महिला प्रीमियर लीग

sakal_logo
By

मुंबई इंडियन्सची
विजयी मालिका कायम

महिला प्रीमियर लीग : यूपी वॉरियर्सचा दुसरा पराभव

मुंबई, ता. १३ ः साईका इशाक व अमेलिया कीर यांची प्रभावी गोलंदाजी आणि हरमनप्रीत कौर, नॅट सीव्हर ब्रंट, यास्तिका भाटीया यांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रविवारी मुंबईत झालेल्या महिला प्रीमियर लीगमधील लढतीत यूपी वॉरियर्स संघावर आठ विकेट व १५ चेंडू राखून विजय मिळवला. या दणदणीत विजयासह मुंबई इंडियन्सने या स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखली. हा त्यांचा सलग चौथा विजय ठरला हे विशेष. यूपी वॉरियर्सला मात्र दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्ससमोर १६० धावांचे आव्हान उभे ठाकले. हिली मॅथ्यूज व यास्तिका भाटीया या जोडीने ५८ धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात करुन दिली. राजेश्‍वरी गायकवाड हिने यास्तिकाला ४२ धावांवर, तर सोफी एक्लेस्टोन हिने मॅथ्यूजला १२ धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला; पण नॅट सीव्हर व हरमनप्रीत कौर या दिग्गज खेळाडूंनी मुंबई इंडियन्सची अधिक पडझड होऊ दिली नाही. दोघींनी नाबाद १०६ धावांची भागीदारी करताना यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. सीव्हर हिने ३१ चेंडूंमध्ये ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४५ धावांची, तर हरमनप्रीतने ३३ चेंडूंमध्ये ९ चौकार व १ षटकारासह नाबाद ५३ धावांची खेळी करीत मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, याआधी यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या डावामध्ये यूपी वॉरियर्स संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीच शानदार कामगिरी केली. कर्णधार एलिसा हिली व ताहलिया मॅग्रा या दोघींनीही अर्धशतकी खेळी साकारली. हिली हिने ४६ चेंडूंमध्ये ७ चौकार व १ षटकाराच्या साथीने ५८ धावांची नेत्रदीपक खेळी केली. मॅग्रा हिने ३७ चेंडूंमध्ये ९ खणखणीत चौकारांसह ५० धावांची खेळी केली. देविका वैद्य (६ धावा), किरण नवगिरे (१७ धावा), सोफी एक्लेस्टोन (१ धाव) व दीप्ती शर्मा (७ धावा) यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. मुंबई इंडियन्सकडून साईका इशाकने ३३ धावा देत ३ फलंदाज बाद केले. अमेलिया कीर हिने २, तर हिली मॅथ्यूज हिने एक फलंदाज बाद केला. यूपी वॉरियर्सने २० षटकांत ६ बाद १५९ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक ः यूपी वॉरियर्स २० षटकांत ६ बाद १५९ धावा (एलिसा हिली ५८, ताहलिया मॅग्रा ५०, साईका इशाक ३/३३) पराभूत वि. मुंबई इंडियन्स १७.३ षटकांत २ बाद १६४ धावा (यास्तिका भाटीया ४२, नॅट सीव्हर नाबाद ४५, हरमनप्रीत कौर नाबाद ५३).