
हा तर जनतेचा अर्थसंकल्प ः केशव उपाध्ये
जनतेच्या अपेक्षा पूर्ण
करणारा ‘पंचामृत अर्थसंकल्प’
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन
कोल्हापूर, ता. १३ ः ‘राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी या सर्वच घटकांच्या इच्छा-आकांक्षांचा विचार केला आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि उद्योग क्षेत्राला नवी भरारी देणारा हा पंचामृत अर्थसंकल्प आहे. यामुळे अडीच वर्षांत रखडलेल्या विकासाला गती मिळेल’, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सरचिटणीस हेमंत अराध्ये यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्ये म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राची पीछेहाट झाली. मात्र, गेल्या आठ महिन्यांत शिवसेना-भाजप युती सरकारने जनतेच्या प्रश्नांची गतीने सोडवणूक केली. वेगाने निर्णय घेऊन विकास प्रकल्पांना गती दिली. यावर्षी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारा आहे. अर्थसंकल्प बनविण्यापूर्वी फडणवीस यांनी लोकांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार सुमारे ४० हजार सूचना आल्या. त्यातून हा अर्थसंकल्प बनवला गेला. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने जनतेचा अर्थसंकल्प आहे.’ पत्रकार परिषदेला महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, नाथाजी पाटील, गणेश देसाई, विजय जाधव उपस्थित होते.
...
कोल्हापूरला निधी कमी पडणार नाही
यावेळी उपाध्ये म्हणाले, ‘जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. शक्तिपीठ जोडण्याच्या योजनेत कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचा समावेश आहे. कोल्हापुरी चप्पलसाठी क्लस्टर योजना आहे. पंचगंगा नदी प्रदूषण, तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासाठी कोल्हापूरला निधी कधीच कमी पडू देणार नाही.’
----------------
एसटी नफ्यात आणू
महिलांना अर्धे तिकीट कशासाठी यावर उपाध्ये म्हणाले, ‘जनतेकडून ज्या सूचना आल्या होत्या त्यांचा विचार करून महिलांना ही सवलत देण्यात आली आहे. पूर्वी एसटीचे पगार वेळेवर होत नव्हते. सेना-भाजप सरकार आल्यापासून त्यांना ठरलेल्या तारखेला पगार मिळतो. तोट्यात गेलेली एसटी सेवा आम्ही फायद्यात आणून दाखवू. ’