प्रशासकीय, तांत्रीक मान्यतेनंतरही कामे रदद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय, तांत्रीक मान्यतेनंतरही कामे रदद
प्रशासकीय, तांत्रीक मान्यतेनंतरही कामे रदद

प्रशासकीय, तांत्रीक मान्यतेनंतरही कामे रदद

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो

...

फ्युचरिस्‍टिक स्‍कूलला नियोजनचा ''झटका''

प्रशासकीय, तांत्रिक मान्यतेनंतरही कामे रद्द

सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता.१३: प्रशासकीय, तांत्रिक मान्यता पूर्ण होवून वर्क ऑर्डरच्या टप्‍प्यावर पोहोचलेल्या ''फ्युचरिस्‍टिक स्‍कूल'' उपक्रमाला नियोजन विभागाने ब्रेक लावला आहे. त्यामुळे जिल्‍हा परिषदेच्या कुरणी (ता.कागल), वसगडे (ता.करवीर), आंबवडे (ता.पन्‍हाळा) तसेच शहरातील नूतन मराठी विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांना परिणामकारक शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही मेन राजारामच्या विकासाची घोषणा केली आहे. किमान याची पूर्तता तरी नियोजन समिती करणार का, याकडे कोल्‍हापूरवासियांचे लक्ष लागले आहे.

जिल्‍हा नियोजन समितीकडून दरवर्षी नाविन्यपूर्ण योजनांवर १२ ते १५ कोटी रुपये खर्च केले जातात. बदलते नवनवीन तंत्रज्ञान, त्याचा समाजावर होणारा परिणाम या सर्वाचे प्रतिंबब या नाविन्यपूर्ण योजनांमध्ये दिसणे आवश्यक असते. त्यादृष्‍टीनेच फ्युचरिस्‍टिक स्‍कूलची योजना घेण्यात आली होती. जिल्‍ह्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये ही योजना घेण्यात आली आहे. त्याचे सकारात्‍मक परिणमाही दिसू लागले आहेत. प्रत्येक तालुक्यात अशा शाळा उभारणे आवश्यक आहे. यातूनच काही लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघामध्ये अशा शाळा सुरु करण्याचा प्रस्‍ताव दाखल केला होता.

माजी मंत्री हसन मुश्रीफ (कुरणी), आमदार ऋतुराज पाटील (वसगडे), आमदार विनय कोरे यांनी आबंवडे येथील जिल्‍हा परिषद शाळेसाठी फ्युचरिस्‍टिक स्‍कूलचा प्रस्‍ताव सादर केला होता. तर खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शहरातील नूतन मराठी विद्यालयाची या उपक्रमासाठी शिफारस केली होती. यातील कुरणी, वसगडे व आंबवडे या तिन्‍ही जिल्‍हा परिषद शाळांचे प्रस्‍ताव मंजूर करुन त्याला प्रशासकीय, तांत्रीक मान्यता देण्यात आली होती. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम सुरु करण्याबाबतचे आदेश देणे प्रलंबित होते. फ्युचरिस्‍टिक स्‍कूलची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही सदरची कामे रद्द झाल्याने आश्‍‍चर्य व्यक्‍त होत आहे.
...

७ कोटी २२ लाखांची कामे रद्द

नियोजन विभागाने यापूर्वी मंजूर केलेल्या ७ कोटी २२ लाखांची कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फ्युचरिस्‍टिक स्‍कूलसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली होती. तसेच जिल्‍ह्यामधील सर्व १२ तालुक्यात शाळा पातळीवर १२ नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रांची निर्मिती करण्याचा प्रस्‍ताव मुख्य कार्यकारी यांच्यामार्फत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पाठवला होता. हा प्रस्‍तावही रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यानिकेतन बॅडमिंटन कोर्टचाही रद्द कामात समावेश आहे.
...

‘मेन राजाराम’चे पुढे काय?

काही महिन्यांपूर्वी भवानी मंडप येथील जिल्‍हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्‍कूलच्या स्‍थलांतराचा विषय चांगलाच गाजला.सर्वच लोकप्रतिनिधींनी मेन राजारामचे स्‍थलांतर न करता, आहे त्याच ठिकाणी सुविधा देण्याची मागणी केली. पालकमंत्री केसरकर यांनीही मेन राजारामच्या विकासाची घोषणा केली. मात्र आतापर्यंत एकही रुपयाची तरतूद केलेली नाही. जिल्‍हा परिषदेने या शाळेसाठी फ्युचरिस्‍टिक स्‍कूलची शिफारस केली आहे. किमान ही शिफारस तरी मंजूर होते का, याकडे आजी,माजी विद्यार्थी व आंदोलकांचे लक्ष लागले आहे.