एसपी पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसपी पत्र
एसपी पत्र

एसपी पत्र

sakal_logo
By

कारवाईमुळेच ते अधिकारी ‘कंट्रोल’ला
अधीक्षक शैलेश बलकवडे; जनसंपर्कासाठी विविध उपक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः शिस्तभंगाची कारवाई, कर्तव्यात कसुरी तसेच चौकशी होऊन शिक्षा झालेले किंवा शिक्षा प्रस्तावित असल्याने संबंधित अधिकारी नियंत्रण कक्षात (कंट्रोल) ठेवल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘सकाळ’कडे पत्रकाद्वारे दिली.
नवख्यांकडे पोलिस ठाण्याची धुरा हे वृत्त रविवारी (ता. १२) प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न, गुन्हे नोंद होण्याची संख्या यांचा विचार करून सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी मंजूर असलेल्या ठिकाणी पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जयसिंगपूर, आजरा, गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची संख्या कमी आहे, तसेच कुठल्याही मोठ्या बंदोबस्ताचे आयोजन नसल्याने मागील काही वर्षांपासून तेथे सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. गडहिंग्लज येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक असून, तिथे पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात २०२१ पासून २६ पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली नसून, १६ जणांवर कारवाई झाली. लाचलुचपत विभागाची कारवाई होणे पोलिस दलासाठी गौरवास्पद नाही. आमचीही तशीच धारणा असून मागील दोन वर्षांत आठ पोलिस अंमलदारांवर शिस्तभंगाची कारवाई पूर्ण करून त्यांना सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती या पत्रकात दिली आहे.
मी सकाळी दहा ते रात्री सात वाजेपर्यंत कार्यालयात नागरिकांसाठी उपस्थित असतो. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक होत असल्याने त्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या तक्रारीसाठी ८४११८४९९२२ हा मोबाईल क्रमांक दिला आहे. त्यावर आलेल्या तक्रारींचीही दखल घेऊन तत्काळ कारवाई केली जात असल्याचे पत्रात म्हटले आहे.

चौकट
कोविड काळात उल्लेखनीय काम
मी कार्यभार घेतल्यानंतर जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात होती. त्यावेळी रस्त्यावरील फिरस्ते, रोजंदारीवर कामगार, लॉकडाउनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या घरी मोलकरीण व स्वयंपाकी न पोहचू शकणे या सर्व बाबींचा विचार ‘मिशन समाधान’ सुरू केले. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या सर्व घटकांमध्ये रोज दीड ते दोन हजार गरजू लोकांना घरपोच फूड पॅकेट दिली. २०२१ च्या महापुरातही सलग ७२ तास प्रत्यक्ष पूरबाधित क्षेत्रात राहून तीन दिवसांत महामार्ग सुरळीत करून नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत केल्याचे बलकवडे यांनी पत्रात म्हटले आहे.