
दोन चोरटे अटक
88832
...
पोकलॅन मशीनच्या सुट्या भागांची चोरी
दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः शास्त्रीनगरातील कारखान्यातून पोकलॅन मशीनचे सुटे भाग चोरल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली. प्रकाश शांताराम कोकाटे (वय २३) व साहील राज पाटील (२२, दोघेही, रा. मोतीनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. ते गवंडी आणि कॅटरर्सचे काम करतात. त्यांच्या ताब्यातून एक मोटार व पोकलॅन मशीनचे सुटे भाग असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, मोतीनगर परिसरातील चोरट्यांनी चोरलेले काही सुटे भाग त्यांच्या शेजारी असलेल्या मोटारीत ठेवल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे पाहणी केली असता पांढऱ्या रंगाची मोटार दिसून आली. तेव्हा गस्तीवर असलेले अमर आडूळकर, नितीन मेश्राम, विशाल खराडे, विशाल शिरगावकर, अविनाश तारळेकर यांनी तेथे असलेल्या कोकाटे आणि पाटील यांच्याकडे अधिक माहिती घेतली, तेव्हा त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी त्यांच्यासमोर असलेल्या पांढऱ्या मोटारीची झडती घेतली असता मोटारीत पोकलॅन मशीनचे काही सुटे भाग मिळून आले. पोलिसांनी मोटारीतील सुटे भाग पाहताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ९ मार्चला पहाटे साडेतीनच्या सुमारास अॅस्टर आधार हॉस्पिटलजवळ असलेल्या गॅरेजमधून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बी. बी. शिंदे अधिक तपास करीत आहेत.