
मनपा १
अमृत योजनेची ११६ कोटींची
कामे लवकर पूर्ण कराःमुख्यमंत्री
कोल्हापूर ता. १३: शहरातील अमृत योजनेची ११६ कोटींची कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यानुसार ठेकेदार कंपनीने योजनेचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
२०१८ पासून निधी असूनही योजनेचे काम रखडले असल्याने मंत्रालयात आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जल अभियंता हर्षजित घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरासाठी अमृत योजनेतंर्गत मिळालेल्या निधीसाठी २०१८ ला वर्कऑर्डर देण्यात आली होती. कामाची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत होती. परंतु या कालावधीत काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर कामासाठी ठेकेदाराला वारंवार मुदत दिली. पण काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदार कंपनीने १९ उपठेकेदार नेमले. ३९६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येणार होते . काही काम पूर्ण झाले आहे. ठेकेदार कंपनीने रस्त्यांचे रिस्टोरेशन केले नसल्याने खड्ड्यांचे साम्राज्य आहे. तसेच १२ टाक्या आणि दोन संप बांधण्यात येणार आहेत. मात्र सर्वच कामे रखडली आहेत.