एकच मिशन, जुनी पेन्शन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकच मिशन, जुनी पेन्शन!
एकच मिशन, जुनी पेन्शन!

एकच मिशन, जुनी पेन्शन!

sakal_logo
By

gad143.jpg
88987
गडहिंग्लज : जुन्या पेन्शन योजनेसाठी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करताना कर्मचारी. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------------------
ich143.jpg
89008
इचलकरंजी ः राज्यव्यापी संपात सहभागी होऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करीत घोषणा दिल्या. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
------------
एकच मिशन, जुनी पेन्शन!
संपामुळे शासकीय कामकाजावर परिणाम; अत्यावश्यक सेवा सुरू
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी महासंघाने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील कर्मचारीही यात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम झाला. शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. कार्यालयाच्या दारातच कर्मचाऱ्यांनी सुमारे तासभर ठिय्या मारला. ''एकच मिशन, जुनी पेन्शन''चा जोरदार आवाज घुमला.
आंदोलनात जुनी पेन्शन संघटनेसह गडहिंग्लज तालुका माध्यमिक शिक्षक संघटना, गडहिंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघ, प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, आरोग्य कर्मचारी संघटना, कृषी सहाय्यक संघटना, ग्रंथपाल संघटना, माजी मुख्याध्यापक संघटनांनी सहभाग घेतला.

मनपाचे ९०० कर्मचारी सहभागी
इचलकरंजी ः जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह विविध मागण्यांप्रश्नी आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात महापालिकेचे तब्बल ९०० कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे महापालिकेचे स्वच्छतेसह प्रशासकीय कामकाज ठप्प राहिले. फक्त अत्यावश्यक सेवेतील सुमारे १५० कर्मचारी कार्यरत आहेत. सकाळी महापालिका प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले. त्यानंतर ठिय्या आंदोलनास सुरुवात करीत घोषणाबाजी केली. आंदोलनाला माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, काँग्रेसचे राहुल खंजिरे, संजय कांबळे यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. ए. बी. पाटील, के. के. कांबळे, शिवाजी जगताप, सुनील बेलेकर, धनंजय पळसुले आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान इचलकरंजी शहरातील शिक्षक संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्याचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांना दिले. इचलकरंजी शहरातही महसूल विभागासह अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला. अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश होणाऱ्या आयजीएम रुग्णालयातील परिचारिका संघटनानी रुग्णालयाच्या परिसरात एकत्रित येऊन आंदोलनास पाठिंबा दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली.

पालिकेचे कामकाज ठप्प
जयसिंगपूर: जयसिंगपूर नगरपालिका कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. पालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. आंदोलनात मोहनकुमार पाटोळे, रमेश कांबळे, गणेश भेंडवडे, मनोज बेग, बाळू कांबळे, सीमा मिसाळ, उत्तम सासणे आदिंनी सहभागी घेतला आहे.

आजऱ्यात आंदोलन
आजरा ः तालुक्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले. तहसीलदार विकास अहिर व गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांना निवेदन दिले. पंचायत समिती ते तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आल्यावर सभेत रुपांतर झाले. सत्यवान्न सोने, मायकेल फर्नांडीस, एकनाथ आजगेकर, सुनिल शिंदे, संभाजी बापट, मुरलीधर कुंभार, सुभाष विभुते, विजय कांबळे, एस. डी. पाटील, अस्मिता साबळे यांची भाषणे झाली. डीसीपीएस शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ (दोनही गट) शिक्षक समिती, समन्वय समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघ, ग्रामसेवक संघटना, अपंग संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आदी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

चंदगडमध्ये मोर्चा
चंदगड ः तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आज येथील तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून जूनी पेन्शन योजनेची मागणी केली. याच मागणीसाठी राज्यव्यापी बंदमध्ये सहभागी होत असल्याचे निवेदन तहसिलदार विनोद रणावरे यांना दिले. चंदगड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, राज्य प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, जूनी पेन्शन हक्क संघटना, पदवीधर प्राथमिक शिक्षक सभा, विमुक्त जाती जमाती शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य सिक्षक परीषद, चंदगड तालुका शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभाग आदी संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले होते.

वडगावमध्ये घोषणाबाजी
पेठवडगाव ः नगरपालिका, तलाठी, शासकीय कार्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी सरसेनापती धनाजी जाधव खुले नाट्यगृहाच्या स्टेजवर घोषणाबाजी केली. नगरपालिकेच्या आरोग्य, कार्यालयीन सेवा ठप्प झाल्या होत्या. वडगाव नगरपालिकेचे कर्मचारी, महसूल कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती रोडावली आहे. आंदोलनास माजी नगरसेवक सुनिल कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील, पॉवरलुमचे अध्यक्ष दिपक पाटील आदीनी पाठिंबा दिला. प्रशासनाधिकारी स्वप्नील रानगे, कार्यालयीन व्यवस्थापक मारुती कदम, मिळकत व्यवस्थापक मेघराज घोडके, भांडारपाल प्रकाश पाटील, सुर्याजी भोपळे आदी उपस्थित होते.