सानेगुरुजी वाचनालय २२ मार्चपर्यंत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सानेगुरुजी वाचनालय २२ मार्चपर्यंत बंद
सानेगुरुजी वाचनालय २२ मार्चपर्यंत बंद

सानेगुरुजी वाचनालय २२ मार्चपर्यंत बंद

sakal_logo
By

सानेगुरुजी वाचनालय २२ मार्चपर्यंत बंद
इमारत धोकादायक : सुपर मार्केटच्या इमारतीत स्थलांतर सुरू
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : येथील नगरपरिषदेच्या पूज्य सानेगुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालयाची इमारत धोकादायक बनल्याने त्याचे स्थलांतर सुरू केले आहे. आजपासून २२ मार्चपर्यंत लक्ष्मी रोडवरील सुपर मार्केटमध्ये वाचनालयाच्या स्थलांतराचे कामकाज पूर्ण करून २३ मार्चपासून वाचनालय सुरू करण्याचे आदेश मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी दिले आहेत.
या वाचनालयाची स्थापना १८७४ मध्ये झाली. गडहिंग्लजला १९८७ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पालिकेच्या नियंत्रणाखाली या वाचनालयाचे कामकाज सुरू झाले. शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाचनालयाची वाटचाल सुरू आहे. वाचनालयाची सध्याची इमारत १९७५ मध्ये बांधली आहे. ती अत्यंत जीर्ण झाली असून कॉलम, बीम, स्लॅबला भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात गळतीही मोठ्या प्रमाणात असते.
दिवसेंदिवस ही इमारत धोकादायक बनत चालल्याने बांधकाम विभागाने कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पत्र दिले होते. या महाविद्यालयाच्या पथकाने इमारतीला भेट देऊन पाहणी केली; परंतु अद्याप या ऑडिटचा अहवाल पालिकेला मिळालेला नसल्याने या धोकादायक इमारतीत वाचनालयाचे कामकाज करणे धोक्याचे असल्याचे मत बांधकाम विभागाने पत्रातून व्यक्त केले आहे. यामुळे मुख्याधिकारी श्री. खारगे यांनी तातडीने या वाचनालयाचे लक्ष्मी रोडवरील सुपर मार्केटमध्ये स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. २३ मार्चपासून नवीन स्थलांतरित जागेत वाचनालय नियमितपणे सुरू राहील, असेही श्री. खारगे यांनी आदेशात म्हटले आहे.
--------------
* ४० हजारांवर ग्रंथ संपदा
या वाचनालयात ४० हजारांवर ग्रंथ असून वर्तमानपत्र वाचन विभागासह स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, पत्रकार कक्ष, ग्रंथ देवघेव कक्ष कार्यरत आहेत. महिला व पुरुष असे स्वतंत्र विभागही आहेत. रोज सुमारे दोनशे वाचक वाचनालयाला भेट देतात. याशिवाय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्‍या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे या वाचनालयाला तातडीने नवीन इमारत बांधकामाची गरज आहे.