
शेतकरी कामगार पक्ष
शेकापतर्फे शुक्रवारपासून
भाई दाजीबा देसाई व्याख्यानमाला
कोल्हापूर , ता. १४ ः शेतकरी कामगार पक्षातर्फे १७ ते १९ मार्च या कालावधीत माजी आमदार भाई दाजीबा देसाई व्याख्यानमाला घेण्यात येणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात दररोज सायंकाळी पाच वाजता ही व्याख्याने होणार आहेत,’ अशी माहिती शहर चिटणीस बाबूराव कदम व प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यातील सेनानी म्हणून दाजीबा देसाई यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून शेतकरी कामगार पक्षाने ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. कोल्हापुरातील डाव्या व पुरोगामी चळवळीला बळ मिळावे, दाजीबा देसाई यांचे उचित स्मारक व्हावे, नवीन पिढीला शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांची ओळख व्हावी आदी हेतूने ही व्याख्यानमाला घेण्यात येत आहे, असे श्री. कदम यांनी सांगितले.
१७ मार्च रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. इस्माईल पठाण हे ‘स्वातंत्र्यचळवळ, मुस्लिम लीग आणि फाळणी’ या विषयावर व्याख्यान देतील. संभाजीराव जगदाळे अध्यक्षस्थानी असतील. १८ मार्च रोजी प्रा. डॉ. भारतभूषण माळी यांचे ‘क्रांतिसिंह नाना पाटील ः जीवनकार्य’ या विषयावर व्याख्यान होईल. दिलीपकुमार जाधव अध्यक्षस्थानी असतील. तर १९ मार्च रोजी राज्यशास्त्राच्या अभ्यासक डॉ. भारती पाटील यांचे ‘शेतकरी कामगार पक्ष व भाई दाजीबा देसाई’ या विषयावर व्याख्यान होईल. वैशाली सूर्यवंशी अध्यक्षस्थानी असतील.