महापालिका कामकाज

महापालिका कामकाज

लोगो-महापालिका
-
89067
-
कचरा उठाव, सफाई बंद
राज्यव्यापी संपात महापालिकेचे कर्मचारी सहभागी; प्रशासकीय कामकाजही थंडावले

कोल्हापूर, ता. १४ ः राज्यव्यापी संपात महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने राजपत्रित अधिकारी, विभागप्रमुख तसेच ठोकमानधन व काही कर्मचारी वगळता कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. काही कार्यालयात एखादा-दुसरा कर्मचारी दिसत असला तरी प्रशासकीय कामकाज थंडावले होते. तसेच सफाई, कचरा उठाव, पाणीपट्टी-घरफाळा वसुलीवर परिणाम झाला.
महापालिका कर्मचारी संघाने केलेल्या आवाहनानुसार कायमचे तसेच रोजंदारीवरील कर्मचारी सकाळी नऊ वाजताच मुख्य इमारतीसमोर जमले. त्यामुळे महापालिकेचा परिसर कर्मचाऱ्यांनी गजबजला होता. ‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे’ यांसह अन्य घोषणा या वेळी दिल्या. संघाचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, दिनकर आवळे यांची भाषणे झाली. त्यानंतर सर्व कर्मचारी मोर्चाने टाऊन हॉल उद्यानात गेले.
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. ते संपात असल्याने शहरातील सर्व भागातील तुंबलेल्‍या गटारी, रस्त्यांवरील स्वच्छता झाली नाही. नागरी सुविधा केंद्रे सुरू होती. पण, तिथे कर भरणा करणे, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र अंतिम झाले असेल तर ते अर्जदारास देणे वा नवीन प्रमाणपत्रासाठी अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू होते. पाणीपट्टी व घरफाळा वसुलीसाठीचे कर्मचारी मात्र कार्यरत असल्याचे दोन्ही विभागातून सांगण्यात आले. तरीही दिवसभरातील वसुलीवर परिणाम झाला. अनेक कार्यालये उघडली होती. पण, तेथील बहुतांश टेबल-खुर्च्या रिकाम्याच होत्या. कामगार विभाग, रेकॉर्ड विभाग, पवडी विभाग, लेखा विभागात काही कर्मचारी दिसत होते. काही कार्यालये बंद होती. मोर्चानंतर त्या काही विभागातील कर्मचारी परत आले होते. जुनी पेन्शन लागू असलेले कर्मचारी संपाबाबत फारसे उत्साही दिसत नव्हते. पण, कर्मचारी संघाने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांना संपात सहभागी होण्याशिवाय पर्याय नव्हता. या साऱ्यामुळे दिवसभरात महापालिकेचे प्रशासकीय कामकाज थंडावले.

चौकट
८० टक्के कर्मचारी कामावर असल्याचा प्रशासनाचा दावा
प्रशासनाने कालच सायंकाळी आदेश काढून विभागप्रमुखांवर कार्यालय सुरू ठेवण्याची जबाबदारी टाकली होती. त्यानुसार सकाळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यामध्ये आज किती कामावर होते, गैरहजर किती होते याची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २० टक्के कर्मचारी संपावर असून मार्च अखेर असल्याने बहुतांश कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर ही आकडेवारी नेमकी उलटी असून दहा-वीस टक्के कर्मचारी कामावर आहेत, असे कर्मचारी संघाच्यावतीने सांगण्यात आले.


चौकट
सफाई, टिपरसाठी २०० कर्मचाऱ्यांची पर्यायी व्यवस्था
शहराची स्वच्छता तसेच कचरा उठावसाठी काम करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी संपावर असल्याने रस्त्यांशेजारी कचऱ्याचे ढिग साठण्याचा व गटारी तुंबण्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने संघटनेला आरोग्य विभागाचे कर्मचारी कामावर हजर राहण्यास सांगितले आहे. पण कंत्राटी तसेच काही खासगी एजन्सीकडील २०० कर्मचाऱ्यांची पर्यायी व्यवस्था केली आहे. सफाईबरोबरच टिपरसाठी ही पर्यायी यंत्रणा राबवण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे उद्या कचरा उठाव व सफाई होण्याची शक्यता आहे.

कोट
आरोग्य विभागातील सेवा अत्यावश्‍यक असल्याने रोजंदारी, कंत्राटी तसेच जुनी पेन्शन लागू असणारे कर्मचारी, एजन्सीकडून घेतले जाणारे कर्मचारी कामावर आले पाहिजेत. टिपरबाबतही उपायुक्त व मुख्य आरोग्य निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. याशिवाय उद्या कोण कर्मचारी कामावर हजर झाले आहेत त्याचा आढावा घेतला जाणार आहे.
डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com