
आम आदमी पत्रकार परिषद
किमान वेतन न मिळाल्यास टिप्पर
चालक सोमवारपासून संपावरः देसाई
कोल्हापूर, ता. १४ : ठेकेदारांकडून किमान वेतन न मिळाल्यास सोमवारपासून (ता. २०) टिप्पर चालक संपावर जाणार असल्याचा इशारा आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. महापालिकेने मुख्य मालक म्हणून किमान वेतन का दिले जात नाही, हे तपासून ठेकेदाराची बिले काढणे अपेक्षित आहे. प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
देसाई म्हणाले, ‘टिप्परचालकांना किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. त्याची तपासणी करून अहवाल देण्याबाबतची सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली होती. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्याचे लेखक्ष निर्देश सहायक कामगार आयुक्तांनी प्रशासकांना दिले आहेत. किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. तरीही किमान वेतन देता येणार नाही, अशा रक्कमेची निविदा महापालिकेने काढली आहे. पक्षातर्फे गुरूवारी (ता. १६) घंटानाद, तर शुक्रवारी (ता. १७) महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवण्यात येणार आहेत. जुनी निविदा रद्द करून नवीन निविदा काढावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. सुमारे दीडशे कर्मचारी संपात सहभागी होत आहेत.’
उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, संतोष घाटगे, मोईन मोकाशी, अमरजा पाटील, कुमार साठे, युवराज कवाळे, संजय राऊत, रणजित बुचडे, नितीन कवाळे उपस्थित होते.