संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

बचत गटांचे शुक्रवारपासून प्रदर्शन
कोल्हापूर ः महिला आर्थिक विकास महामंडळ (मविम) व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता.१७) पासून बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन होणार आहे. १९ मार्चपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत दसरा चौक मैदान येथे हे प्रदर्शन होईल. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटांची उत्‍पादने विक्रीसाठी असतील. त्यामध्ये नाबार्डतर्फे सांगली, सातारा व रत्नागिरी तसेच ‘नाबार्ड’ अंतर्गत कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थेच्या बचत गटांतील महिलांना स्टॉल देण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचे उद्‍घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कोल्हापुरी मसाले, कोल्हापुरी चप्पल, विविध प्रकारचे तांदूळ, पापड, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, बांबूच्या विविध वस्तू, गारमेंट, तृणधान्य महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, नाचणीयुक्त पदार्थ, राजगिरा यांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात येणार आहेत.
.............
८९०८८, ८९०९०
‘खासगी प्राथमिक’च्या अध्यक्षपदी शिवाजी भोसले
कोल्हापूर ः महापालिका खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी भोसले यांची, तर उपाध्यक्षपदी माधुरी घाटगे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. गले यांच्या अध्यक्षतेखाली व नीलेश पाटील यांच्या उपस्थितीत निवडी झाल्या. श्री. भोसले यांचे नाव साताप्पा कासार यांनी सुचवले, तर शिवाजी सोनाळकर यांनी अनुमोदन दिले. घाटगे यांचे नाव वर्षाराणी वायदंडे यांनी सुचवले. त्यांना सूर्यकांत बरगे यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर संस्थापक भरत रसाळे, विद्यमान चेअरमन महादेव डावरे, सचिव सारिका पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक मच्छिंद्र नाळे, वसंत पाटील, सर्जेराव नाईक, कृष्णात चौगले, अमित परीट, रोहिणी येडगे, राजेश कोंडेकर, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी, सुबोध कोल्हटकर, रमेश गुंजाळ, कुणाल भालकर, ऋषिकेश बोडके आदी उपस्थित होते.
............
स्वरानंद संगीत ॲकॅडमीचे स्नेहसंमेलन
कोल्हापूर ः येथील स्वरानंद संगीत ॲकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच झाले. देवल क्लबमध्ये झालेल्या या संमेलनात शास्त्रीय गायन, वादन, नृत्य, हिंदी व मराठी गझल सादर झाल्या. पं. अरुण कुलकर्णी, श्रीकांत डिग्रजकर, डॉ. अनिलकुमार वैद्य, शिवकुमार चव्हाण, कुलदीप भोसले, डॉ. अरुण परितेकर, डॉ. भारत खराटे, उमेश बुधले, सुखदा गोगटे, ॲकॅडमीचे संचालक श्रीधर सुतार आदी प्रमुख उपस्थित होते. शिवाजी सुतार (की बोर्ड), संदेश खेडेकर (तबला), गुरू ढोले (ॲक्टोपॅड) यांची साथसंगत होती. ॲड. कृष्णात माने यांनी सूत्रसंचालन केले. शेखर गुळवणी यांचे ध्वनी संयोजन होते.
............
पेन्शनरांची सोमवारी बैठक
कोल्हापूर ः केंद्र सरकारच्या पेन्शनरांविरोधी भूमिकेला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर पेन्शनरांचे संघटन सुरू आहे. काकीनाडा येथे सोमवारी (ता. २०) होणाऱ्या एकजूट बैठकीला सर्व संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रीय समन्वय समितीचे सहनिमंत्रक अतुल दिघे यांनी केले आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये पेन्शन योजनेत बदल करून केंद्राने दरमहा सरासरी अडीच हजार रुपयांचे नुकसान केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही योग्य कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पाच संघटना एकत्र येऊन संघटित लढा दिला जाणार आहे.