
सीपीआर रूग्णालय
सीपीआरमध्ये नियमित
शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
व्हाईट आर्मीच्या जवानांचे मदतकार्य
कोल्हापूर ,ता. १४ ः शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात सीपीआर रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारीही सहभागी झाले आहेत. येथे व्हाईट आर्मीच्या जवानांनी मदतकार्य केले. त्यामुळे अपघात विभागातील रूग्ण व जखमींवरील उपचारसेवा सुरळीत सरू होती. गंभीर रूग्णांवर उपचारासाठी वरिष्ठ डॉक्टर उपचार सेवेत होते. त्यामुळे काही गंभीर रूग्णांवरील शस्त्रक्रिया झाल्या तर नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.
सीपीआर रूग्णालयातील वैद्यकीय शिक्षण विभागाचे जवळपास दीडशेहून अधिक वैद्यकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यात परिचारीका, प्रशासकीय कर्मचारी, आरोग्य सेवक व वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. त्यामुळे उपचार सेवेला मनुष्यबळ अपुरे पडत होते. सकाळी आठ वाजल्यापासून व्हाईट आर्मीचे जवान रूग्णवाहिकेसह येथे आले. त्यांनी अपघात विभागात येणाऱ्या रूग्णांना स्ट्रेचरवरून विभागात घेणे, गंभीर अवस्थेतील रूग्णांना वॉर्डात घेऊन जाणे इथपासून ते उपचार यंत्रणेला वैद्यकीय साधन सामुग्री नेऊन देण्यापर्यंतची सेवा बजावली.
याचवेळी महालक्ष्मी अन्नछत्रकडून सीपीआरमध्ये मदत कार्यात असलेले जवान व कामावरील कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवण देण्यात आले.
तर प्रशासकीय पातळीवर कंत्राटी वैद्यकीय कर्मचारी, आंतरवासिता डॉक्टर्स तसेच प्रशिक्षणार्थी परिचारिकांची मदत घेऊऩ विविध विभागात उपचार सेवा सज्ज ठेवण्यात आली.