शालेय पोषण आहाराचा खेळखंडोबा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय पोषण आहाराचा खेळखंडोबा !
शालेय पोषण आहाराचा खेळखंडोबा !

शालेय पोषण आहाराचा खेळखंडोबा !

sakal_logo
By

शालेय पोषण आहाराचा खेळखंडोबा!
वर्षभरात तिसऱ्यांदा उसनवारीची वेळ; दीड महिन्यांपासून धान्याचा पुरवठाच नाही
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : नियोजनाचा अभाव असला की एखाद्या चांगल्या योजनेचाही कसा खेळखंडोबा होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून शालेय पोषण आहार योजनेकडे पाहावे लागले. दीड महिन्यांपासून शासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून धान्यादी साहित्याचा पुरवठाच झालेला नाही. परिणामी, यंदाच्या शैक्षणिक वर्षात तिसऱ्यांदा उसनवारीवर आहार शिजवण्याची वेळ आली आहे. उसनवारीही कुवतीबाहेर गेल्यामुळे काही शाळांत आहार शिजविणेच बंद केल्याचे वास्तव आहे.
शासनाच्या प्राथमिक शाळा व अनुदानित माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. आहार शिजवण्यासाठी शाळांच्या पातळीवर बचत गटांना ठेका दिलेला आहे. तांदूळ, मसाले, कडधान्य पुरवण्यासाठी शासनाने आपल्या पातळीवर ठेकेदाराची नेमणूक केली आहे. मात्र, साहित्याच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. नियोजनाअभावी पुरवठ्यात विलंब होत असल्याचे दिसून येते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात तिसऱ्यांदा पुरवठ्यास विलंब झाला आहे.
ठेकेदाराकडून यापूर्वी केलेला साहित्य पुरवठा जानेवारी अखेरपर्यंतचा होता. फेब्रुवारीपासून धान्याचा पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे पोषण आहार शिजवणाऱ्यांना उसनवारी करून आहार शिजवण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यांनी तरी किती वेळा आणि किती दिवस उसनवारी करायची याला मर्यादा आहेत. जवळपास दीड महिन्यापांसून त्यांची उसनवारी सुरू आहे. आता ती कुवतीबाहेर गेल्यामुळे काही शाळांतील ठेकेदारांनी पोषण आहार शिजवणेच बंद केल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहत आहेत.
----------------
* मार्च उलटणार...?
धान्यादी साहित्याचा पुरवठा कधी होणार याला समर्पक उत्तर मिळत नाही. पोषण आहाराचा मेनू सातत्याने बदलला जातो. यावेळचा मेनू अद्याप निश्चित झालेला नाही, हे विशेष. त्याच्या निश्चितीनंतर शाळा-तालुकास्तरावरून मागणी नोंदविली जाणार आणि त्याच्या एकत्रिकरणानंतर ठेकेदाराकडून धान्यादीचा पुरवठा केला जाणार आहे. म्हणजेच आता तातडीने हालचाली झाल्या तरी धान्य पुरवठ्याला मार्च महिना उलटणार हे निश्चित आहे.
------------------
* आधी शिजवा मग पुरवा...
खरे तर धान्य आधी पुरवा आणि मग शिजवा हे शालेय पोषण आहाराचे सूत्र आहे. मात्र, नियोजनाचा अभाव असल्याने वेळेत धान्यादी साहित्याचा पुरवठा होत नसल्याचे यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिसून आले आहे. परिणामी, उसनवारीतून आहार शिजवावा लागत असल्याने आधी शिजवा मग पुरवा असे नवे सूत्र तयार झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.