
मोर्चा शासकीय कर्मचारी
पेन्शन पे बात करेगा, वही राज करेगा
शासकीय कर्मचारी, शिक्षकांचा धडक मोर्चा : वाहतुकीची कोंडी
कोल्हापूर, ता. १४ : ‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे’,‘ जो पेन्शन पे बात करेगा, वही देश पे राज करेगा’, ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’, ‘शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध असो’ अशा जोरदार घोषणा देत आज शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या विविध १४ संघटनांनी कोल्हापूर शहरात धडक मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. दरम्यान, टाऊन हॉल, दसरा चौक, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक ते पुन्हा टॉऊन हॉल या मार्गावर निघालेल्या मोर्चामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागली.
शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी सकाळी टॉऊन हॉल येथून मोर्चाला सुरुवात केली. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध १४ संघटनांसह २० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने शहर गजबजून गेले. लक्षवेधी घोषणा आणि शिस्तबध्दपणे निघालेल्या मोर्चामुळे दुपारच्या उन्हातही आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. मोर्चामधील सहभागी कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली.
दरम्यान, सरकारने जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, नसेल तर १९७७ ला ५४ दिवस झालेल्या बेमुदत संपाची पुनरावृत्ती केली जाईल, असा इशारा राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर यांनी आज दिला. लवेकर म्हणाले, ‘जुनी पेन्शन लागू करावी यासह इतर मागण्यांसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, शासनाने याकडे लक्ष दिले नाही. चर्चेचे गुऱ्हाळ कायम ठेवून कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली आहे. यापुढे कर्मचाऱ्यांची दिशाभूल होणार नाही. काहीही झाले तरी, जुनी पेन्शन घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.’ तसेच सरकारने मागणी मान्य केलीच पाहिजे, त्याशिवाय एकही कर्मचारी, शिक्षक कामावर हजर राहणार नाही, असे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
....
* यांचा राहिला सहभाग
जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, सीपीआर हॉस्पिटल, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य कर्मचारी संघटना, जिल्हा नर्सिंग फेडरेशन, जिल्हा शासकीय मुद्रण संघटना, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, पेन्शन संघटनांसह ९२ कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले.
...
*लक्षवेधी टोप्या
मोर्चात सहभागी हजारो कर्मचारी आणि शिक्षकांनी ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ ही टॅगलाईन छापलेल्या पांढऱ्या टोप्या लक्षवेधी ठरल्या. महिला व पुरुष दोघांनीही टोप्या घालून आपआपल्या संघटनेचे फलक हातात घेतले होते. उन्हाचा तडाखा जाणवत असतानाही उत्साहाने मोर्चा यशस्वी केला.
...
* प्रमुख मागण्या
- जुनी पेन्शन लागू करा
- पीएफआरडीए बिल रद्द करा
- राष्ट्रीय पेन्शन रद्द करा
...
* सकाळी १० ते १ पर्यंत
टॉऊन हॉल येथे एकत्र येणार
‘बेमुदत संप सुरु असेपर्यंत सर्व कर्मचारी सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत टॉऊन हॉल येथे एकत्र येतील. या ठिकाणी आपआपली भूमिका मांडतील. शासनाच्या चुकीच्या धोरणाविषयी चर्चा करतील, अशी माहिती राज्य कर्मचारी संघटनेनेच अनिल लवेकर यांनी दिली.