
चित्रनगरीत नवे तीन प्रोजेक्ट
चित्रनगरीत नवे तीन शूटिंग प्रोजेक्ट
शूटिंग डेस्टीनेशन कोल्हापूर; लवकरच मंदिर, चाळ, वसतिगृहाच्या बांधकामालाही प्रारंभ
संभाजी गंडमाळे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः येथील चित्रनगरीत आता आणखी तीन नवे शूटिंग प्रोजेक्ट लवकरच सुरू होणार आहेत. एका हिंदी टॉक शोबरोबरच दोन मालिकांचा त्यामध्ये समावेश असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे हळूहळू शूटिंगचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे चित्रनगरीत मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावरही भर दिला जाणार आहे. सुमारे दहा कोटींच्या निधीतून लवकरच चित्रनगरी परिसरात आणखी एक वाडा, चाळ, मंदिर आणि स्टुडिओच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
‘शूटिंग डेस्टीनेशन कोल्हापूर’ ही कोल्हापूरची ओळख पुन्हा तयार करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. कोरोना काळात मुंबई, पुण्यातील शूटिंग बंद झाल्यानंतर हे प्रोजेक्ट कोल्हापुरात आणण्यासाठी अधिक प्रयत्न झाले आणि चार ते पाच प्रोजेक्ट चित्रनगरी आणि परिसरात सुरू झाले. पण, नंतरच्या काळात कोल्हापुरातील कोरोनाचे प्रमाण वाढल्यानंतर शूटिंगवर बंधने आल्याने हे प्रोजेक्ट शेजारील राज्यात गेले. ते पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी आता विविध माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. आता नव्याने आणखी तीन प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर चित्रनगरी पुन्हा शूटिंगने बहरणार आहे.
चौकट
तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील कामे...
चित्रनगरीतील पहिल्या दोन टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मंदिराची उभारणी, रेल्वे इंजिन व डब्यासह रेल्वेस्थानकाची उभारणी, जुन्या पद्धतीची चाळ, आणखी एक नवीन वाडा, वीस खोल्यांचे वसतिगृह, दीडशे बाय शंभर फुटांचा स्टुडिओ आदी कामांचा समावेश आहे. ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. सुमारे २७ कोटींची ही कामे असून, त्यातील दहा कोटींची कामे लवकरच सुरू होणार आहेत.
चौकट
चित्रनगरीतील प्रॉपर्टी
एखाद्या मालिकेचे किंवा चित्रपटाचे शूटिंग संपले की त्यासाठी उभारलेले सेट फोडावेच लागतात. मात्र, चित्रनगरी व्यवस्थापनाने हे सेट न फोडता संबंधित निर्मात्यांकडून काही किमतीत विकत घेतले आहेत आणि ते आहे तसेच ठेवले आहेत. त्यातच आवश्यकतेनुसार बदल करून विविध मालिकांचे शूटिंग येथे सुरू आहे. ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेच्या सेटमध्ये किरकोळ बदल करून तेथे सध्या ‘शेगाविचे संत गजानन'' या मालिकेचे शूटिंग सुरू असून, ‘मेहंदी है रचनेवाली’ मालिकेचा सेट कोणत्याही कौटुंबिक मालिकेसाठी वापरता येणार आहे.
चौकट
...तर खर्च आणखी कमी होणार
चित्रनगरीत शूटिंगचे प्रमाण वाढत असून, येथील कमी निर्मिती खर्च हे त्यामागील प्रमुख कारण आहे. चित्रनगरी परिसरातच कलाकार व तंत्रज्ञांची राहण्याची सुविधा झाली तर हा खर्च आणखी कमी होणार आहे. साहजिकच व्यवस्थापनाने वसतिगृहाला प्राधान्य दिले आहे.