शिवाजी विद्यापीठ, पुणे, नागपूर विद्यापीठाची आगेकूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठ, पुणे, नागपूर विद्यापीठाची आगेकूच
शिवाजी विद्यापीठ, पुणे, नागपूर विद्यापीठाची आगेकूच

शिवाजी विद्यापीठ, पुणे, नागपूर विद्यापीठाची आगेकूच

sakal_logo
By

89137
-
लोगो- कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा
-
शिवाजी विद्यापीठ, पुणे, नागपूर विद्यापीठाची आगेकूच

कोल्हापूर, ता. १४ ः राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये आज शिवाजी विद्यापीठाच्या दोन्ही संघांनी विजयी कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांवर मोठे विजय मिळविले. पुणे आणि नागपूर संघांनी आगेकूच कायम राखली.
सकाळच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाने सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठावर आठ गडी राखून विजय मिळविला. सोलापूर विद्यापीठाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १०५ धावा केल्या. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाने फलंदाजी करताना ११.२ षटकांत २ बाद ११० धावा करून सामना जिंकला. शिवाजी विद्यापीठाचे अजय आयरेकर सामनावीर ठरले. दुसऱ्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठावर ८१ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना पुण्याने २० षटकांत ८ बाद १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल लोणेरे संघ २० षटकांत ९ बाद १०८ धावा करू शकला. मनिष गायकवाड यांना सामनावीर घोषित करण्यात आले.
दुपारच्या सत्रात नागपूरच्या महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर आठ गडी राखून विजय मिळविला. नाबाद ३८ धावांसह एक बळीही मिळविणाऱ्या नागपूरच्या अजय गावंडे यांना सामनावीर घोषित करण्यात आले.

चौकट
विद्यापीठाच्या ‘ब’ संघाचा विजय
दिवसातला अखेरचा सामना शिवाजी विद्यापीठाचा ‘ब’ संघ आणि नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यात झाला. हा सामना शिवाजी विद्यापीठ ‘ब’ संघाने ८१ धावांनी जिंकला. या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि २० षटकांत ७ बाद २३० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नाशिक संघ २० षटकांत ६ बाद १४९ धावाच करू शकला. सामन्यात ३३ धावा आणि एक बळी घेणारा संतोष शिंदे सामनावीर ठरला.