जिल्ह्यातील संपात प्राथमिक शिक्षक संघ सक्रीय राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील संपात प्राथमिक शिक्षक संघ सक्रीय राहणार
जिल्ह्यातील संपात प्राथमिक शिक्षक संघ सक्रीय राहणार

जिल्ह्यातील संपात प्राथमिक शिक्षक संघ सक्रीय राहणार

sakal_logo
By

थोरात यांच्या ‘माघारी’नंतर
चार तालुकाध्यक्षांचा राजीनामा

संपात जिल्ह्यातील ‘शिक्षक संघ’ सक्रीय राहणार; रविकुमार पाटील यांची माहिती

कोल्हापूर, ता. १४ ः जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजीराव थोरात यांनी बेमुदत संपातून माघार घेत असल्याची घोषणा दुपारी केली. त्यावर माघारीचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत या संघाचे शाहूवाडी, शिरोळ, गगनबावडा, कागल तालुका अध्यक्षांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. जिल्ह्यातील संपात प्राथमिक शिक्षक संघ सक्रीय राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील आणि सरचिटणीस सुनील पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शासकीय मध्यवर्ती कर्मचारी संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या मोर्चात सकाळी प्राथमिक शिक्षक संघाच्या थोरात गटाचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. मात्र, दुपारी अध्यक्ष थोरात यांनी संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. माघार मान्य नसल्याचे सांगत शाहूवाडी तालुकाअध्यक्ष शिवाजीराव रोडे-पाटील, शिरोळ तालुकाध्यक्ष विजय भोसले, कागल तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, गगनबावडा तालुकाध्यक्ष संजय मोळे, सरचिटणीस अमोल खोबरे, पन्हाळा सरचिटणीस दत्ता गुरव, राधानगरी सरचिटणीस साताप्पा पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांच्याकडे दिला. दरम्यान, ‘अध्यक्ष थोरात यांच्या संपातून माघारीच्या भूमिकेबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील संघाचे नेतेमंडळी, तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, आदींशी संपर्क साधला. त्यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणल्यानंतर संपात सहभाग राहण्याचा निर्णय घेतला. आता माघार नाही, आम्ही संपात सहभागी आहोत. उद्यापासून सक्रिय सहभाग घेऊन होणाऱ्या सर्व आंदोलनांमध्ये शिक्षक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पाटील आणि सरचिटणीस सुनील पाटील यांनी केले.