
अंबाबाई मुर्ती पाहणी
लोगो ः मूर्ती संवर्धन
केंद्रीय ‘पुरातत्त्व’च्या
अहवालानंतर निर्णय
जिल्हाधिकारी; अंबाबाई मूर्तीची अधिकाऱ्यांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची पाहणी आज केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. त्याबाबतचा अहवाल लवकरच दिला जाणार आहे. त्यानंतर संवर्धनासंदर्भात पुढील निर्णय होईल, अशी माहिती आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी राजेश्वरी, शिवन्नाकुमार, राम निगम, उत्तम कांबळे यांनी सकाळी मंदिरात मूर्तीची पाहणी केली. पाहणीनंतर सध्यस्थितीत मूर्ती सुरक्षित असून काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिल्याचेही श्री. रेखावार यांनी स्पष्ट केले.
श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली असून तिचे संवर्धन तत्काळ व्हावे, अशी मागणी झाल्यानंतर २८ फेब्रुवारीला राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबतचा अहवाल पाठवल्यानंतर आजची पाहणी झाली. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, श्रीपूजक मंडळाचे माधव मुनीश्वर आदी उपस्थित होते.
खेळखंडोबा नको...
श्री अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत आता तरी कुठलाही खेळखंडोबा करू नये, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी केली. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी आल्याची माहिती मिळताच ते मंदिरात आले आणि त्यांनी याबाबतची विचारणा अधिकाऱ्यांना केली; मात्र, मूर्तीबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाच दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांची समिती नेमूनच योग्य पद्धतीने संवर्धनाची प्रक्रिया झाली पाहिजे, अशी भूमिका श्री. पवार यांनी मांडली.
दाव्यावर आज सुनावणी
दरम्यान, श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी संवर्धन प्रक्रियेबाबत स्थानिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याची आजची सुनावणी झाली नाही. ही सुनावणी उद्या (ता. १५) होणार आहे.