
अंमलपदार्थांपासून कसे दूर रहायचे
वेळीच धोका ओळखा,
नाहीतर आयुष्यभराचा विळखा
पोलिसांचा प्रबोधनासोबतच कारवाईचा बडगा
लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : मुलगा पार्टीला गेला होता, भूक लागत नाही म्हणून त्याला मित्रांनी काही खायला, ओढायला दिले. ‘एन्जॉय’ म्हणून सिगारेट ओढली. त्याचा चेहरा निस्तेज दिसतो. पालकांनी वेळीच ही लक्षणे ओळखली पाहिजेत. कारण तुमचा मुलगा अमलीपदार्थांच्या विळख्यात अडकला असण्याची शक्यता आहे. यावर पोलिसांनी आता प्रबोधन सुरू केले असून विक्रीही कायमची बंद होईल याचीही खबरदारी घेतली जात आहे. आपणही पालक म्हणूनही सजग राहण्याची आवश्यकता आहे. वेळीच हा धोका ओळखला तर आयुष्यभराच्या या विळख्यातून मुक्ती मिळू शकते.
शहरातील चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक ते सहा मार्च दरम्यान घेतलेल्या मोहिमेत ओपन बार आणि गांजा ओढणाऱ्यांमध्ये तरुणाई अधिक असल्याचे दिसले. यामध्ये उच्चशिक्षितांसोबतच कॉलेजकुमार असल्यामुळे अमलीपदार्थांचा धोका वेळीच रोखला पाहिजे. या विळख्यातून त्यांना बाहेर पडले पाहिजे. अन्यथा पैसे उधार मागणे, मित्रांसाठी अनधिकृत कामे करणे, चैनीखोरांची संगत लागणे, छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापासून अवैध कामे करण्यापर्यंत यांची मजल जाऊ शकते. यासाठी पोलिसांनी दोन स्तरावर काम सुरू केले आहे. यामध्ये ज्यांच्याकडून गांजाची विक्री होते त्यांनाच रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र नियोजन केले आहे. त्यांचे संशयित ठिकाणी रोज गस्त वाढविली आहे. उपनगरातील पोलिस चौक्या सुरू केल्या आहेत. या व्यतिरिक्त ही तरुणाई अमलीपदार्थांच्या विळख्यात अडकणारच नाही याची ही दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी प्रबोधन सुरू केले आहे.
कोट
अमलीपदार्थांपासून कॉलेजकुमारांना दूर ठेवण्यासाठी नुकताच शहाजी लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना काही टिप्स दिल्या. मित्रांसोबत जाताना काय खायचे-प्यायचे यावर नियंत्रण ठेवा, सिगारेट, गांजा सारख्या पदार्थांपासून जाणीवपूर्वक दूर रहा. व्यसनी मित्रापासून दूर राहिले पाहिजे. वेळीच समुपदेशन घेतले पाहिजे. पालकांनीही बारकाईने लक्ष दिल्यास अमलीपदार्थांपासून दूर ठेवणे शक्य आहे.
-महादेव वाघमोडे, निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा