
सायबर कॉलेज व्याख्यान
तरुणांनी समाज विकासाचे
अग्रदूत बनावे ः प्रिया पाटील
कोल्हापूर, ता. १५ ः विद्यार्थीदशेतच विद्यार्थांचे करिअर घडते. विद्यार्थ्यांनी सातत्य, जिद्द व चिकाटी राखल्यास त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळू शकते. तसेच तरुणांनी समाज विकासाचे अग्रदूत बनावे, अशी अपेक्षा गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी व्यक्त केली. सायबर महाविद्यालयातील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागातर्फे विद्यार्थ्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांतील सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. दीपक भोसले होते.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक सुनील जोशी यांनी कंपनी कायदा १९४८ च्या महत्त्वपूर्ण तरतुदी सांगून विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातही स्वतःची, कुटुंबाची व समाजाची काळजी घेणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले. डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, डॉ. सोनिया राजपूत, डॉ. सुरेश आपटे, डॉ. कालिंदी रणभरे, डॉ. बी. एन. पाटील, प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. शर्वरी काटकर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. डी. एन. वळवी यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल पाटील यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी शुभम शिंदे यांनी आभार मानले.