सीपीआर संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर संप
सीपीआर संप

सीपीआर संप

sakal_logo
By

१५० शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

सीपीआरमध्ये व्हाईट आर्मीची मदत; अपघात विभागासह नियमित रुग्णसेवा सुरूचकोल्हापूर, ता.१५ ः शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सीपीआरचे वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी १५० वर नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. गंभीर रुग्णांवरील शस्त्रक्रिया आज करण्यात आल्या, तर उपचार सेवेसाठी व्हाईट आर्मीची मदत घेण्यात आली. त्यामुळे अपघात विभागातील रुग्णसेवा नियमित सुरू राहिली. काही मोजके रुग्ण खासगी रुग्णालयाकडे जात आहेत.

सीपीआरमधील जवळपास तीनशेवर परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे वॉर्डमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांवर उपचारपूरक सेवा करण्यासाठी प्रशिक्षणार्थी परिचारिकांची मदत घेतली जात आहे. त्यांच्याकडून वॉर्डात सेवा दिली जात आहे. बहुतांशी परिचारिका दिवसभर येथे सेवा देतात. मात्र, रात्रीची ड्यूटी करण्यास त्यांच्याकडून नकार दिला जातो. सीपीआरच्या सोळा वॉर्डांत ३२० हून अधिक रुग्ण आहेत. मात्र, परिचारिकांअभावी तेथे रात्री उपचार सेवा देण्यात अडथळे येत आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शेंडापार्क कार्यालयातील स्टाफ तसेच आंतरवासीता डॉक्टर्स आणि एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनाही येथे सेवेसाठी बोलावले आहे.
सीपीआरच्या अपघात विभागात दर दहा मिनिटाला एक जखमी रुग्ण येतोच. त्यांना रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवर घेणे, अपघात विभागात दाखल करणे यासाठी व्हाईट आर्मीचे २० जवान येथे सेवा देत आहेत. या जवानांमुळे अपघात विभागातील सेवा सुरळीत सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रशासनातील बहुतांशी लिपिक संपात सहभागी असल्याने वैद्यकीय बिले, दैनंदिन प्रशासकीय कामकाज संथगतीने सुरू आहे.
....

नियमित रुग्णांच्या संख्येत घट

शासकीय डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे सीपीआरमध्ये उपचार सेवा मिळणार नाही, अशा गैरसमजातून अनेक रुग्ण किंवा जखमी खासगी रुग्णालयाकडे जात आहेत. परिणामी सीपीआरमध्ये उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे.
.............

‘अपघात विभागासह सर्व विभागांतील उपचार सेवा सुरू आहे. यात गंभीर रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जातात. त्यासाठी प्राध्यापक, डॉक्टर्स येथे तपासणी व उपचार करत आहेत. त्यामुळे सध्या उपचारासाठी दाखल असलेल्या सर्वच रुग्णांवर उपचार नियमितपणे सुरू आहेत.

डॉ. गिरीश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक